Ajit Pawar on NCP Politicle Crisis : मुंबई : शिवसेनेपाठोपाठ (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा राजकीय (Maharashtra Political Crisis) भूकंपानं हादरलं. गेल्या दोन वर्षांत राज्यातील जनतेनं अनेक राजकीय भूकंप अनुभवले आहेत. पण राष्ट्रवादीतील या फुटीचं कट-कारस्थान नेमकं कसं रचलं गेलं? कुणालाच कसा सुगावा लागला नाही? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. याच प्रश्नांची उत्तरं आता खुद्द शरद पवारांची साथ सोडून गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Minister Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असताना, मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो, असा खळबळजनक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 


थोरल्या पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या महायुतीतील सहभागाबाबतचा किस्सा सांगितला आहे. दिल्लीत पत्रकारांसोबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अध्यक्ष अजित पवार यांचा गप्पांचा फड रंगला होता. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्यापूर्वी काय-काय आणि कसं-कसं जुळवून आणलं? याबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले. 


अजित पवारांच्या वेशांतराची इन्साईड स्टोरी 


मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये कशी सहभागी झाली? याबद्दलचे खुलासे केले. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दहा वेळा बैठका झाल्या होत्या, असंही अजित पवार यांनी सांगितलं. 


राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी 


राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलै रोजी होण्यची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र, नीट यूजी परीक्षेसंदर्भातील सुनावणी दिवसभर सुरु राहिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेळ मिळाला नाही. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी या संदर्भातील प्रश्न सरन्यायाधीशांसमोर मांडला. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीसंबंधीची सुनावणी 29 जुलै रोजी तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलै रोजी होणार असल्याचं सांगितलं आहे.


पाहा व्हिडीओ : Ajit Pawar Delhi Meting | मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो, अजित पवारांनी सांगितला किस्सा