कोल्हापूर: अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडणं, हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. परंतु, मला या गोष्टीचं तितकंस आश्चर्य वाटत नाही. भाजपने गेल्या १० वर्षातील त्यांची कामगिरी आणि विरोधकांबद्दलची श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याशी संबंधित आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. तेव्हाच आम्हाला वाटलं की, ही अशोक चव्हाण यांना एकप्रकारे दिलेली धमकी आहे. तेव्हाच या गोष्टीचे काहीतरी परिणाम होतील, असे वाटले होते. अखेर ते झालंच, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे जागावाटप, चंडीगड महापौरपदाची निवडणूक, राहुल गांधींची पदयात्रा अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. इंडिया आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेबाबत पवारांनी सविस्तरपणे भाष्य केले. इंडिया आघाडीती पक्षांनी एकत्रित काम करावे, अशी आमची भूमिका आहे. प्रत्येक राज्यात संबंधित पक्षांनी चर्चा करावी. पण काही ठिकाणी जागावाटपावरुन वाद सुरु आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. या दोन राज्यात जागावाटपावरुन एकमत झालेले नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत. अशा समस्या आम्ही अद्याप हाताळलेल्या नाहीत. सध्या जिथे-जिथे शक्य आहे, तिकडे इंडिया आघाडीतील पक्षांनी जागावाटपाची चर्चा संपवावी. त्यानंतर जिथे वाद असतील तिथे इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, असे आमचे धोरण असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होण्याचा अंदाज: शरद पवार
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवार यांनी भाष्य केले. या चर्चेत बहुतांश जागांवर एकमत झाले असून काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे. मात्र, या जागा कोणत्या, हे मी सांगू शकत नाही. जागावाटपाच्या चर्चेत मी सहभागी नाही. आमच्याकडून जयंत पाटील, शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे जागावाटपाची चर्चा करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे. आंबेडकरांनी सूचना केली होती की, एकत्र बसणे आवश्यक आहे. उद्या लोकांसमोर आपला सामूदायिक कार्यक्रम काय, याची चर्चा सध्या सुरु असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
मोदींना लोकसभेतील विजयाची खात्री नाही: शरद पवार
अनेक राज्यात भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांची फोडाफोडी केली जात आहे. याविषयी शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हेच पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे. त्यांना लोकसभेतील विजयाची खात्री नाही. अनेक सर्वेक्षणं भाजपच्या विरोधात निकाल असल्याचे सांगत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ५० टक्के जागा मिळत आहेत. त्यामुळे भाजपला काहीही करुन राज्य अस्थिर करायचे आहे. त्यादृष्टीने भाजप पावले टाकत आहे. ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. भाजपचे लोक सांगत असतात की, मोदी है तो मुमकिन है. तेच नामुमकिन असल्याचे आम्हाला दिसत आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
आणखी वाचा
बारामतीमध्ये अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या शरद पवारांच्या ताफ्यात!