पुणे: अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या परिसरातील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी एक नवा वाद ओढवून घेतला. यावेळी झालेल्या सभेत भाषण करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक घोडचूक केली. अजित पवार भाषणावेळी संभाजी महाराजांची प्रशंसा करत होते. तेव्हा भाषणाच्या ओघात अजित पवार यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या आयुष्यात एकही 'निवडणूक' हरले नाहीत. खरंतर संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) एकही लढाई हरले नाहीत, असे अजितदादांना म्हणायचे होते. परंतु, भाषणाच्या ओघात त्यांच्या तोंडातून लढाईऐवजी निवडणूक हा शब्द निघाला. त्यावेळी व्यासपीठावर बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच अजित पवार यांना चूक लक्षात आणून दिली. 


देवेंद्र फडणवीस यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवार यांनी लगेच झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्याशिवाय दुसरं काही सूचत नाही. पण आमच्यातील देवेंद्र फडणवीस हे निष्णात आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे लक्षात आणून देतात. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल अजित पवारांनी फडणवीसांचे आभारही मानले. तसेच पुढे काही चुका झाल्या तर अशाचप्रकारे आमच्या लक्षात आणून द्या, असे अजित पवार यांनी म्हटले. मात्र, अजित पवार यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता विरोधकांकडून अजित पवार यांना लक्ष्य केले जाऊ शकते. 


छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी परिसराच्या विकासासाठी 397 कोटींचा निधी


छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखडा एकूण 397 कोटी रुपये मंजूर झाला आहे. त्यापैकी 270 कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यानंतर तुळापूर नगरीत तिन्ही नेत्यांची सभा पार पडली.


यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे चांगले स्मारक व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानुसार हे स्मारक होईल. 397 कोटींचा विकास आरखडा मंजूर झाला आहे. सर्व सुख-सुविधायुक्त स्मारक तयार केले जाईल.वढू येथील जागा कमी पडत आहे. मात्र राज्य सरकारची केएम हॉस्पिटल साठी देण्यात येणारी जागा पुन्हा घेऊन तिथे मंदिर व इतर विकास कामे केली जातील, असे अजित पवार यांनी सांगितले.


आणखी वाचा


मावळ लोकसभेवरूनही महायुतीत वाद पेटला! अजित पवार गटाच्या आमदाराकडून खासदार श्रीरंग बारणेंविरोधात अहवाल तयार