Ajit Pawar Mimicry बीड: बीड रेल्वे स्थानकाचे (Beed Railway Station) आज (17 सप्टेंबर) लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक खासदार, आमदार देखील उपस्थित होते. दरम्यान, बीड रेल्वे स्थानकाचे लोकापर्ण झाल्यानंतर अजित पवारांनी भाषण करत बीडमधील विविध मुद्दे मांडले. यावेळी अजित पवारांनी सभेतल्या हुल्लड बाजांचे कानही टोचले.
आजच्यादिवशी फक्त रेल्वेने मोफत प्रवास करायचा. त्यानंतर पुढे नेहमी रेल्वेने तिकीट काढून प्रवास करायचा, असं अजित पवारांनी बीडकरांना म्हणाले. मोफत प्रवास आजच्या दिवसापुरताच आहे, कारण आज उद्घाटन आहे. त्यामुळे चांगल्या सवयी लावा, असं अजित पवारांनी सांगितले. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी मगाचपासून बघतोय..मी महाराष्ट्रात फिरत असतो...वेगवेगळ्या भागात जात असतो...पण तुम्ही असे चिगळल्यात की तुमचे नेते उठले की, ह्या.. हू...अरे कधी रे सुधारणार तुम्ही...मग मी काही बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले, असे म्हणाला. अरे जग कुठे चाललंय..जरा आत्मचिंतन करा...कशामध्ये आपण वाद घालतोय...कशासाठी समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करताय?, असं म्हणत अजित पवारांनी बीडकरांना सुनावलं.
रेल्वेसोबत विमानतळंही करायचंय- अजित पवार
रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांच्या काळात या रेल्वेचे भूमिपूजन झाले.आज नवीन 68 किमी रेल्वे मार्गाची ची सुरुवात आहे. बीडकरांनी या मार्गाला वेळ का लागला याचं निरीक्षण केलं पाहिजे. आज या उद्घाटनाला दोन मोठे योग आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असे दोन योग आहेत. हा मार्ग दोन जिल्ह्यांना जोडणारा नाही, तर लाखो लोकांच्या स्वप्नाला जोडणार आहे. रेल्वे बरोबर विमानतळही करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले. नको तिथे राजकारण आणू नये, आम्ही भरभरून द्यायला तयार आहोत. पण काम चांगलं झालं पाहिजे. थोड्या थोड्या पैशाकरता सहा विधानसभा मतदारसंघातील कामात थांबले, असतील तर मी पैसे उपलब्ध करून देतो, हे मी मुख्यमंत्र्यांसमोर सांगत आहे, असंही अजित पवार म्हणाले.
राजकीय दबाव आला तरी मी आहे- अजित पवार
आशिया खंडातलं पहिलं ग्रामीण विद्यालय आणि रुग्णालय अंबाजोगाई येथे आहे. माझ्या बीडमधल्या गोरगरिबाला उपचारासाठी पुण्याला जायची गरज पडू नये. परळीला पशुसंवर्धन महाविद्यालय करत आहोत. इथे बसलेले मुंडे भाऊ - बहीण थोडं बजरंग आणि माझं काही ऐकणारे आहेत. आता वाद घालू नका. कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही, हे अर्थमंत्री म्हणून सांगतो. दिलेला पैसा सत्कारणी लागला पाहिजे. पैसा चुकीच्या मार्गाने खर्च झाला तर कोणाचीही गय केली जाणार नाही. राजकीय दबाव आला तरी मी आहे, असा इशारा देखील अजित पवारांनी दिला.