पुणे : पुण्याचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले सुरेश कलमाडी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. जवळपास २० मिनिटे शरद पवारांनी कलमाडींशी चर्चा केली. गेल्या काही वर्षांपासून कलमाडी सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा राजकीय सोहळ्यात त्यांची उपस्थिती दिसली नव्हती. काही दिवसांपासून ते आजारी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Continues below advertisement

सुरेश कलमाडी यांनी पवारांना विचारलं  'हाऊ आर यु' 

सुरेश कलमाडी हे त्यांनी सुरू केलेल्या पुणे फेस्टिवल या कार्यक्रमाला सुद्धा यंदा उपस्थित राहिले नव्हते. याच दरम्यान काल पुणे दौऱ्यावर असणारे शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन सुरेश कलमाडी यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. काल (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाची कार्यकारणी बैठक आणि मेळावा पार पडला या मेळाव्याच्या आधीच शरद पवार यांनी थेट दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गाठत सुरेश कालमाडी यांची भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली. शरद पवारांना पाहतात सुरेश कलमाडी यांनी पवारांना 'हाऊ आर यु' असं विचारलं त्यावर पवारांनी कलमाडींना 'आय अँम फाईन' असं उत्तर दिले. डॉ. धनंजय केळकर यांनी कालमाडी यांच्या तब्बेतीची सविस्तर माहिती शरद पवार यांना दिली. ही एक नियोजित भेट होती. पवारांनी कलमाडींच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

कलमाडी यांच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितले की ते गेल्या चार दिवसांपासून नियमित आरोग्य तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात आहेत. कलमाडी यांची प्रकृती चांगली आहे. कोणत्याही गंभीर आरोग्य समस्या आढळल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील काही दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे असे सहाय्यकाने सांगितले. यावेळेस शरद पवार यांच्यासोबत मीरा कलमाडी, सुमिर कलमाडी, विठ्ठल मणियार, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. एकेकाळी दिल्ली गाजवणाऱ्या महाराष्ट्रातील या दोन मैत्रांचे दिल्ली दरबारी मोठे सूत जुळत असे. शरद पवार आणि सुरेश कालमाडी यांच्या मैत्रीचे अनेक किस्से राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. 

Continues below advertisement

सबसे बड़ा खिलाड़ी, सुरेशभाई कलमाडी

एकेकाळी “सबसे बड़ा खिलाड़ी, सुरेशभाई कलमाडी” या नावाने ओळखले जाणारे कलमाडी पुण्यातील राजकारणाचे समानार्थी मानले जात होते. पुण्यातून दिल्लीपर्यंत त्यांचा प्रभाव होता. १९९५ ते २००७ या काळात काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा प्रचंड होता. राजकीय वर्तुळात त्यांना ‘भाई’ म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या एका शब्दालाही महत्त्व दिले जात असे. मात्र २०१० मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला. या प्रकरणात काँग्रेसने त्यांना निलंबित केले, तर जवळपास नऊ महिने त्यांना तिहार जेलमध्येही राहावे लागले. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने पुण्यातील रस्ते, सुशोभीकरण, क्रीडानगरीची उभारणी यासह कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. परंतु या कामांमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कलमाडींच्या राजकीय प्रवासावर कायमचा परिणाम झाला. आज प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल असलेले कलमाडी पूर्वीचा तो प्रभाव गमावून बसले असले तरी पुण्याच्या राजकारणात त्यांचे नाव आजही लोकांना आठवते.