पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) सभेत शरद पवारांचा (Sharad Pawar) जयजयकार झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंबेगाव विधानसभेतल्या मंचर या गावात सोमवारी (4 मार्च) झालेल्या अजित पवारांच्या सभेत हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालंय. नंतर इतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढलं असलं तरी दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) मतदारसंघात असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांना आंबेगावचं मैदान जड जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय.
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील मंचर येथे 4 मार्च रोजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. त्यावेळी स्टेजवर जुन्नरचे आमदार अतुल बेनके बोलत असताना खालून एका व्यक्तीने शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी सर्वांचं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं. पण अतुल बेनके यांनी त्याकडे लक्ष देऊ नका असं सांगत लाऊड स्पीकरच्या आवाजात ही घोषणाबाजी दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाजूच्या एका कार्यकर्त्यांने घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीला बाजूला नेलं.
अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या सभेमध्ये थेट शरद पवारांच्या नावाचा जयजयकार केल्याचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल (Ajit Pawar Manchar Sabha Viral Video) होत आहेत. काही जणांनी घोषणाबाजी करणारा तो व्यक्ती हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं म्हटलं. तर काहींनी त्या व्यक्तीला नंतर मारहाण करण्यात आल्याचं म्हटलंय.
दिलीप वळसेंच्या मतदारसंघात दुसऱ्यांदा प्रकार
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगाव विधानसभेत असा प्रकार दुसऱ्यांदा घडला. या आधीही दिलीप वळसेंना शरद पवारांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. शिरूर तालुक्यातील पाबळ गावात बैलगाडा शर्यतीवेळी तो प्रसंग घडला होता. वळसे पाटील हे त्या ठिकाणच्या पाणी प्रश्नाबाबत बोलत असताना, खालून शरद पवारांच्या नावाचा जयघोष झाला. त्यावेळी दिलीप वळसेंवर आपलं भाषण आटोपतं घेण्याची वेळ आली होती.
वळसे पाटलांचा वार जिव्हारी, त्यांना पाडण्याचं शरद पवारांचं आवाहन
शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांच्या मंचरमध्ये सभा घेतली आणि त्यांना पाडण्याचं आवाहन केलं होतं. ज्या व्यक्तीला आपण सर्व काही दिलं त्या व्यक्तीने आपल्याला फसवलं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत गेले. सर्वजण गेले तरी दिलीप वळसे शरद पवारांची साथ सोडणार नाहीत असं म्हटलं जायचं. पण वळसे पाटलांच्या निर्णयामुळे खुद्द शरद पवारांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळेच दिलीप वळसेंच्या मतदारसंघात सभा घेऊन शरद पवारांनी त्यांना पराभूत करण्याचं आवाहन तिथल्या मतदारांना केलं होतं.
VIDEO : अजित पवारांच्या मंचरमधील सभेत शरद पवारांच्या नावाचा जयजयकार?