Ajit Pawar, Lonavala : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोणावळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेत अधिकाऱ्यांना तंबी दिलीये. "कुठं आहेत लोणावळा सीईओ, बोलवून घ्या, त्यांना सांगा पालकमंत्री अजितदादा पवारांनी बोलावलं आहे. साहेब मी आलोय, इथं वरती येऊन बसा, नीट ऐका. परत म्हणून नका मला समजलं नाही, जे तुमच्या अधिकारात आहे, तेवढं हो म्हणा अन् ज्या मंत्र्यांच्या हातात आहे त्यांचं नाव सांगा, मी त्यांना बोलतो. जो निधी पाहिजे तो मी देईन अन मला तेवढी अक्कल आहे, मी अर्थमंत्री आहे", असं अजित पवार यावेळी अधिकाऱ्यांना बोलताना म्हणाले. ते लोणावळा येथील जन सन्मान यात्रेच्या सभेत बोलत होते. 


माझं हॉटेल असलं तरी तिथं कारवाई व्हायला हवी, चिरीमिरी साठी कारवाई टाळू नका


अजित पवार म्हणाले,  लोणावळ्यातील परिस्थिती गंभीर होत आहे, अतिशय चुकीचे प्रकार इथं घडत आहेत. ड्रग्सचा वापर होताना दिसतोय. या नव्या पिढीला बरबाद करण्याचे, त्यांना व्यसनाधीन करण्याचे अधिकार कोणी दिलेले नाहीत. त्यामुळं मुंबईत बैठक घेऊन मी पोलिसांना याबद्दल कडक आणि कठोर कारवाईचे आदेश देणार आहे. मी पोलिसांना आज वोर्निंग देतोय, यापुढं जिथं कुठं ड्रग्सचे प्रकार आढळतील, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर मी कारवाई करणार. मी अजिबात हे खपवून घेणार नाही, गृह विभागाला सांगून मी कारवाईला करायला लावणारच. अगदी माझं हॉटेल असलं तरी तिथं कारवाई व्हायला हवी. चिरीमिरी साठी कारवाई टाळू नका. हफ्ते देणाऱ्यांवर कारवाई करणार नाही अन् हफ्ते न देणाऱ्यांवर कारवाई करणार, असं अजिबात चालणार नाही. 


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, एमडी, एमए, गांजा, चरस विक्री होते. तुम्ही सांगा होतं का हे? हात वर करा, अरे तुमच्यासाठी करतोय मी, हात वर करा, तुम्ही काय भेकड आहात की काय? हा, आता बघा इतके लोक हात वर करतायेत, म्हणजे हे घडतंय. मग पोलिसांनी हे पहावं. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही गुन्हे दाखल करा, चांगली कलमं लावा. लोणावळा सुरक्षित वाटायला हवी.


अजित पवारांच्या भाषणातील मुद्दे


लोणावळ्यात पर्यटकांची संख्या मोठी असते. पण इथं येणाऱ्या पर्यटकांनी खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. सलगच्या सुट्ट्या लागून आल्या की लोणावळ्यात वाहतूक कोंडी सुद्धा होत असते, आत्ता ही मी चौकाजवळ येण्यापूर्वी वाहतूक कोंडी जाणवली. लता मंगेशकर एकेकाळी आठ तास पुणे-मुंबई प्रवासात अडकल्या होत्या. हा त्रास अनेकांना होतो, त्याअनुषंगाने आपण वेगवेगळे पर्याय शोधत असतो. आता मिसिंक लिंक तयार होतोय, बोरघाट पूर्वी या मार्गाला लागलं की थेट लोणावळ्याच्या पलीकडे गाडी बाहेर पडणार. बऱ्याच वर्षांपूर्वी खोपोलीत रमाकांतचा वडापाव तर खंड्याळात दाजींची भजी खाल्ल्याशिवाय पुणे-मुंबई प्रवास व्हायचा नाही. मात्र काळानुरूप बदल झाले, द्रुतगती मार्ग उभारला गेला आणि या फेमस व्यावसायिकांना फटका बसला. त्यामुळं व्यवसाय करताना ठिकाण योग्य निवडा. मला जेंव्हा फारसं ओळखलं जातं नव्हतं. तेंव्हा मी लोणावळ्यामार्गे आलो की भुशी धरणासह विविध पॉइंटवर यायची, तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यायचो. मात्र आता मला लोक ओळखायला लागले आणि यामध्ये खंड पडला.


इतर महत्वाच्या बातम्या 


Election Commission : हरियाणामध्ये एक तर जम्मू-काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक, 4 ऑक्टोबरला निकाल, महाराष्ट्राच्या निवडणुका कधी? निवडणूक आयोगाची मोठी घोषणा