मुंबई : महायुतीमधील (Mahayuti) तीन पक्षात काही आलबेल नसल्याची टीका सातत्याने होत असते. मात्र, महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तिन्ही पक्षातील जागावाटप पूर्ण होईल. तसेच, तिन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यास त्यांची नाराजी दूर करण्याचं काम तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचं आहे. त्यानुसार, आम्ही विधानसभा निवडणुकांना विकासकामांच्या आणि केंद्रात व राज्यात एकाच विचारांचं सरकार असल्याच्या माध्यमातून सामोरे जात आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी सांगितले. यावेळी, महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, किंवा महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण, या प्रश्नावरही अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना परखडपणे भूमिका मांडली.
राज्यात पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौरा आखला असून आढावा घेण्यासाठीची तयारीदेखील केली आहे. त्यामुळे, राजकीय पक्षाचे नेते विविध दौरै आणि सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरे असून आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी विधानसभेच्या तयारीची माहिती दिली. तसेच, महायुतीत सर्वकाही आलबेल असून महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढवू आणि, त्या निवडणुकांना सामोरे जाऊ, असेही त्यांनी म्हटले. यावेळी, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, यावरही त्यांनी भाष्य केलं.
एकत्रित बसून मुख्यमंत्री ठरवू
महायुतीच्या उमेदवारांची घोषणा पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात होणार आहे. मुख्यमंत्रीपदाबात आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ. मात्र, महायुतीच्या माध्यमातून सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच महायुतीमधील वादावर किंवा महायुतीमधील इतर नेत्यांच्या वक्तव्यावर बोलताना, निर्णय प्रक्रियेत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते काय बोलतात ह्याला महत्व आहे. त्यामुळे, इतर कोण काय बोलतंय ह्याकडे मी लक्ष देत नाही, असे म्हणत तानाजी सावंत यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, घडलेल्या घटनाक्रम सांगताना पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या, असं ते म्हणाले. तसेच, विरोधकांना यामध्ये काही संशय वाटत असल्यास याप्रकरणाचा तपास व्हावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.