मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. तर यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे त्यांनी म्हटले होते. या टीकेवरून आता शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) आमदार  भरत गोगवले (Bharat Gogawale) यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 


मुख्यमंत्र्यांचा एन्काऊंटर करायला संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील- भरत गोगावले 


संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे, अशा खरमरीत शब्दात भरत गोगावले यांनी टीका केली आहे. अक्षय शिंदेने केलेल्या पापाचे कृत्य जर भारताबाहेरच्या कुठल्या देशात असतं, तर त्याला तिथल्या तिथेच गोळ्या घालून ठार केल असतं. मात्र आपला देश संविधानवर चालतो. आपल्या देशात माजबूत कायदा सुव्यवस्था आहे. त्यामुळे कायद्यानुसारच ती शिक्षा झाली असती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गरिबांचे मसीहा आहेत. त्यामुळे राज्यातील जनता त्यांना पुन्हा सत्तेत बसवत मुख्यमंत्री करेल. त्यामुळे संजय राऊतांच्या पोटात दुखायला लागले आहे. त्यातूनच ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एन्काऊंटर करायला संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील, असे म्हणत  आमदार भरत गोगावले यांनी पलटवार केला आहे.  


नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? 


राज्यात आणि देशात असे अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहे. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे तेवढं गृहमंत्री आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला आरोपीने आपल्या जबावात काही खुलासे केले होते म्हणून त्याचं एन्काऊंटर झालं. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय. दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या