मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा पराभव झाल्यानंतर भाजपने आपल्या आक्रमक हिंदुत्त्ववादी अजेंड्याची लाईन कायम ठेवली असली तरी आता अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या पराभवातून धडा घेतल्याचे दिसत आहे. कारण, अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) आता विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मते (Minority Votes) मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील अल्पसंख्याक विभागाची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नेतृत्वात पक्ष कार्यालयात ही बैठक गेली तब्बल दोन तास सुरु होती. या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल, याबाबतच्या मुद्द्यांवर मंथन झाले.


या बैठकीत अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांनी आपली मते ठामपणे मांडली. महायुतीमध्ये मुस्लीम समाजाला दुजाभावाची वागणूक मिळत आहे. महायुतीच्या मित्रपक्षांमधील नेते सातत्याने मुस्लीम समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 


मुस्लीम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी


राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) घटक पक्ष असलेल्या टीडीपी पक्षाने आंध्रप्रदेश सरकारने मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण दिलं आहे. त्यामुळे राज्यात देखील मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल आहे, ही भूमिका अल्पसंख्याक नेत्यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी राज्य सरकारकडे मुस्लीम आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणीही या नेत्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून दुरावलेला मुस्लिम मतदार पुन्हा एकदा आपल्या पक्षाकडे वळावा, यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असल्याचे अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांकडून बैठकीवेळी सांगण्यात आले. 


लोकसभा निवडणुकीत मुस्लीम आणि दलित मतदारांचा महायुतीला दणका


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुस्लीम आणि दलित मतदारांनी चांगलाच दणका दिला होता. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतं एकटवल्याने महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. मुंबईतील जवळपास चार ते पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांनी मविआच्या उमेदवारांना साथ दिली होती. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पराभूत झाले होते. भाजपच्या मुंबईतील मंथन बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब बोलूनही दाखवली होती. मुंबईत मराठी जनतेने ठाकरे गटाला मतदान केले नाही. तर विशिष्ट समाजाने मतदान केल्यामुळे ठाकरे गटाला एकाच भागातून मोठी आघाडी मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. 


आणखी वाचा


मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'