मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती.  या भेटीची जोरदार चर्चा झाली होती. अजित पवार गटाच्या नेत्यांनी या भेटीबाबत कानावर हात ठेवत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत नेहमीप्रमाणे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले होते. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरु केल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवली होती. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देणे योग्य नाही. किंबहुना आरक्षण म्हणजे गरिबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही, असे सांगत भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सगळ्या काळात छगन भुजबळ अजितदादा गटात एकाकी पडल्याचे चित्र होते. ठामपणे ओबीसी समाजाचा पुरस्कार करत असल्यामुळे मराठा समाजाच्यादृष्टीने छगन भुजबळ हे खलनायक झाले आहेत. त्यामुळेच आता छगन भुजबळ हे कोणत्याही राजकीय पक्षाला नकोसे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


गेल्या काही काळापासून छगन भुजबळ हे अजित पवार गटात फारसे समाधानी नसल्याची चर्चा आहे. मध्यंतरी ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. तर काल शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे छगन भुजबळ पुन्हा माघारी परतणार, अशी कुजबुज पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, सध्याच्या घडीला छगन भुजबळ यांना पक्षात घेण्याचा धोका कोणीही पत्कारणार नाही. मराठा आरक्षणविरोधी नेता म्हणून तयार झालेली प्रतिमा छगन भुजबळ यांच्यासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे असला 'जळता निखारा' हातात धरायला कोणताही राजकीय पक्ष तयार नाही. 


एवढेच नव्हे तर अजित पवार गटही छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे काहीसा चिंतेत असल्याचे सांगितले जाते. छगन भुजबळ यांच्या प्रो-ओबीसी भूमिकेमुळे अजितदादा गटाला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. अजितदादा गटाची मुख्य ताकद ही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आहे. या भागात मराठा समाजाची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही. या सगळ्यामुळे छगन भुजबळ यांची अजित पवार गटात घुसमट होताना दिसत आहे. मात्र, मराठा आरक्षणविरोधी प्रतिमेमुळे छगन भुजबळ यांना अपेक्षित एक्झिट किंवा संधी मिळत नसल्याचे सांगितले जाते.


आणखी वाचा


मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, हे बोलणं योग्य नाही; भुजबळांचं वक्तव्य शिवसेनेला झोंबलं