मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या जन सन्मान यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दिंडोरी (Dindori) मतदारसंघातून त्यांनी आपली यात्रा सुरू केली असून महिला भगिनींसह कार्यकर्त्यानीही त्यांचं जंगी स्वागत केलं.यावेळी, भाषण करताना अजित पवारांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण लाडकी बहीण योजना राबवत असल्याचे सांगत, रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये पहिला हफ्ता जमा होणार असून मी कालच 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. तर, देवळाली मतदारसंघातील दौऱ्यात याठिकाणी मोठा निधी दिल्याचं सांगताना, काहीवेळा आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) माझ्याकडे रडत येते, पण मी तिला सांगतो रडू नको, तुझं काम मी करतो, असेही अजित पवार यांनी म्हटले. 


देवळालीकरांनी सरोज अहिरे यांना पहिल्यांदा निवडून दिलं. मात्र, पहिल्याच टर्ममध्ये मी त्यांच्या देवळाली मतदारसंघासाठी 1400 ते 1500 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. त्यांनी अजुनही अपेक्षा व्यक्त केली असून मी अजुनही त्यांना निधी देणारं आहे.  निधी देताना चिंगुसपना करणार नाही, हा दादाचा वादा आहे, असे म्हणत अजित पवारांनी देवळाली मतदारसंघाती जनतेला आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचं आवाहन केलंय. तसेच, एखादं काम झालं नाही तर कधी कधी सरोज माझ्यासमोर येऊन रडते. मी तिला सांगतो रडू नको बाई, तुझं काम करतो. तिचं काम म्हणजे तुम्हा मतदारांचे काम असतं, असेही अजित पवारांनी म्हटले. दरम्यान, आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेउन पूढे जात आहोत. आम्ही कोरोना काळात चांगलं काम करून दाखवलं तसचं अजून करून दाखवू, असेही अजित पवार यांनी म्हटले. 


शेतकरी मेळाव्यातून बळीराजाला साद


दिंडोरीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्ममध्ये अजित पवारांनी शेतकरी मेळाव्याल उद्देशून भाषण केलं. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं, त्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल, ती या राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. त्याचप्रमाणे शेतीकरिता आवश्यक वस्तूंवरील जीएसटी माफ करण्यासंदर्भात जीएसटी परिषदेत मुद्दा उपस्थित करू, हे देखील स्पष्ट केलं. कांदा निर्यातबंदीसारखे निर्णय पुन्हा घेतले जाणार नाहीत, याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या (एनसीडीसी) माध्यमातून राज्याच्या सहकारी साखर कारखान्यांना 2200 कोटी रुपये देण्यात आले आहेत. सरकारनं एक रुपयाची विमा योजना सुरू केली आहे. सध्या महाराष्ट्रात सौर ऊर्जा प्रकल्पाची वीज उत्पादन क्षमता 9 हजार मेगा वॅट इतकी आहे, त्यासाठी सरकारनं स्वत:ची 35 हजार एकर जमीन वापरात आणली आहे, संपूर्ण जमीन राज्य सरकारची आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा देखील मोफत वीज पुरवठा करणं शक्य होईल आणि तसं केलं सुद्धा जाईल. याशिवाय महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आम्ही राज्यभरात प्रभावीपणे राबवली. यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर सर्व योजनांसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती देखील अजित पवार यांनी मेळाव्यातून दिली.