Maharashtra Vidhan Sabha Election Shivadi Constituency मुंबई: लोकसभेत मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसली आहे. ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आगामी विधानसभेत ठाकरेंची नजर प्रामुख्यानं मुंबईवर असेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेत्यांच्या समर्थकांकडून उमेदवारीचं नाव जाहीर होण्याआधीच सोशल मीडियातून प्रचार सुरु केल्याचं दिसून येत आहे. 


शिवडी विधानसभा (Shivadi Assembly Constituency) मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) हे विद्यमान आमदार आहेत. मात्र याच विधानसभा मतदारसंघात लालबागचा राजाचे मानद सचिव आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांच्या समर्थकांकडून याच मतदारसंघात "बदल हवा आमदार नवा" अशा प्रकारचा सोशल मीडियावर प्रचार केला जातोय. अजय चौधरी यांच्या समर्थकांकडून "आमदार अजय चौधरी हॅट्रिक साधणार, इतिहास घडवणार" अशा प्रकारचे पोस्टर्स सोशल मीडियावर  पाहायला मिळतोय.  त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी यांच्यासोबत  सुधीर साळवी  उमेदवारीसाठी इच्छुक असून दोन्ही समर्थकांकडून उमेदवारी जाहीर होण्याआधी  सोशल मीडियावर होणाऱ्या या प्रचाराची जोरदार चर्चा विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.


2014, 2019 मध्ये अजय चौधरींचा विजय-


शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी मोठा विजय मिळवलेला. अजय चौधरी यांनी तब्बल 42 हजार मतांनी विजय मिळवत पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघावर भगवा फडकवलेला. अजय चौधरी यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार उदय फणसेकर आणि मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दणदणीत पराभव केला. अजय चौधरींच्या तुलनते या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात तितका जनसंपर्क नव्हता. अजय चौधरी यांचा विधानसभा निवडणूक 2014 मध्येही विजय झाला होता.


मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी-


आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेच्या 6 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवडी मतदारसंघात बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी यांच्यात लढत होणार की बाळा नांदगावकरविरुद्ध सुधीर साळवी, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.


यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी-


यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी भाजप-शिवसेना यांची महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीमध्ये थेट लढत होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील समीकरणं बदलली आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.


संबंधित बातमी:


मुंबई, ठाणे ते रायगड, सिंधुदुर्गपर्यंत...; कोणाचं पारडं भारी?, विधानसभा निवडणुकीआधी सर्व आमदारांची यादी, एका क्लिकवर