मुंबई : महाराष्ट्रात राजकारणाला रंग चढला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांचे जागावाटपाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होऊ शकते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी (मविआ) (Vanchit Bahujan Aghadi) हा पक्षदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. आता एमआयएमहा (MIM) पक्षदेखील महाराष्ट्रात आपले उमेदवार देणार आहे. तशी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी दिली आहे. विशेष म्हणजे जलील महाराष्ट्रातील उमदेवारांची यादी हैदराबादला घेऊन जाणार असून तेथेच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. 


इच्छुकांची यादी घेऊन हैदराबादला जाणार 


एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रातील निवडणूक लढवणार आहे. तशी माहिती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. एमआयएमने जलील यांना संभाजीनगरातून उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे जलील यांच्याकडून जोमात प्रचार केला जातोय. दरम्यान, एमआयएम संभाजीनगरशिवाय अन्य काही जागांवरही उमेदवार देणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना जलील म्हणाले की, आम्ही अगोदर सहा जागा लढवण्याचं ठरवलं होत. मात्र आता इच्छुकांची संख्या वाढत आहे. इच्छुकांची यादी घेऊन मी हैदराबादला जाणार आहे. इच्छुक नेत्यांची राजकीय माहिती, त्यांना याआधी किती मते मिळली होती, याची सर्व माहिती मी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना देणार आहे.


अहवालाचाही विचार करणार 


या लोकसभा निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी ओवैसी यांनी एक खासगी संस्था नेमली होती. या संस्थेने ओवैसी यांच्याकडे अहवाल दिला आहे. या अहवालाचाही विचार केला जाणार आहे, असे जलील यांनी सांगितले. तसेच एखाद्या पक्षाचे चांगले उमेदवार असल्यास त्यालाही आम्ही पाठिंबा देऊ. हा पाठिंबा देताना पक्षाचा विचार केला जाणार नाही, असेही यावेळी जलील यांनी स्पष्ट केले. 


प्रकाश आंबेडकरांसाठी आमचे दरवाजे खुले


इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांना युतीची खुली ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी आमचे दार नेहमी खुले आहे. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी वाट पाहिली. त्यांनी तेथे वेळ घालवलं. एमआयएम आणि वंचित यांची युती ही नैसर्गिक आहे. त्यामुळे आम्ही आंबेडकर यांचे स्वागतच करू, असेही जलील म्हणाले.  


महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार?


दरम्यान, एमआयएम पक्ष महाराष्ट्रात उमेदवार देणार असल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढू शकते. एमआयएमला मतं देणाऱ्यांची संख्या बरीच आहे. यात मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. एमआयएमने महाराष्ट्रात उमेदवार दिल्यास काँग्रेसची पर्यायाने महाविकास आघाडीची मतं फुटू शकतात. त्याच फायदा महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढू शकते.