Ghanshyam Shelar Joins BRS : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) अहमदनगरमध्ये (Ahmednagar) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले अहमदनगरच्या श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार (Ghanshyam Selar) यांनी बीआरएसमध्ये (BRS) प्रवेश केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू समजले जाणारे घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून दस्तुरखुद्द केसीआर (K. Chandrashekar Rao) यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. 


केसीआर यांचा मोर्चा अहमदनगरकडे


येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रातही विस्तार करायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना गळाला लावण्यात केसीआर यांना यश मिळताना दिसत आहे. नांदेड, औरंगाबादमध्ये विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीआरएसच्या ताफ्यात प्रवेश केल्यानंतर आता केसीआर यांनी आपला मोर्चा अहमदनगरकडे वळवला आहे.


निलेश लंकेंचं नाव चर्चेत आल्याने राष्ट्रवादीला रामराम


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात घनश्याम शेलार यांचं नाव आढावा बैठकीत पुढे करण्यात आलं होतं. मात्र आमदार निलेश लंके यांचं नाव देखील चर्चेत आल्याने पुढच्या घडामोडी घडण्याच्या आधीच शेलार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.


राहुल जगताप सक्रिय झाल्याने शेलारांच्या मनात अस्वस्थता


भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना, वंचित बहुजन आघाडी मग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत आता घनश्याम शेलार यांनी बीआरएसची वाट धरली आहे. घनश्याम शेलार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांना विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. केवळ 750 मतांनी घनश्याम शेलार यांचा पराभव झाला होता. मात्र राष्ट्रवादीचे  माजी आमदार राहुल जगताप हे पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याने शेलार यांच्या मनात अस्वस्थता होती. त्याच भावनेतून त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याची चर्चा आहे.


हेही वाचा


Bhagirath Bhalke : राष्ट्रवादीला झटका, भगीरथ भालके आज बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांची भेट घेणार, भालकेंसाठी खास विमान सोलापुरात दाखल