अहमदनगर: मी काही अहमदनगरमधून निवडणूक अर्ज भरलेला नाही. उगीच स्वतःच महत्व वाढवण्यासाठी दुसऱ्याचे नाव घेणं हे काही शहाणपणाचे लक्षण नाही, असा टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी विखे-पाटलांना लगावला. अहमदनगरमध्ये मविआ विरुद्ध महायुती (Ahmednagar Lok Sabha Constituency) अशी न राहता विखे विरुद्ध पवार अशी असल्याचे चित्र रंगवले जात असल्याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले. शरद पवार हे अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.


पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, भाजपसोबत जाण्याची निर्णय आम्ही घेतला होता. ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला, मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे पहाटेच्या शपथविधी झाला  असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला होता. अजित पवारांच्या या विधानावर भाजपसोबत जाण्याची आमची इच्छा नव्हती आणि कधीही नसणार, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. 


अमित शहा यांनाही प्रत्युत्तर-


अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अमित शहा यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मागील दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं असा प्रश्न मला विचारला जातो. मी तर सत्तेत नव्हतो, तुम्ही सत्तेत होता तुम्ही काय केलं हे सांगितले पाहिजे, असं सांगत त्या आधी मी सत्तेत असताना मी काय केलं आहे हे सर्व जनतेला माहीत असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. 


अहमदनगरमधून सुजय विखे की निलेश लंके, कोण मारणार बाजी?


आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालाची सर्वांचा उत्सुकता लागून आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल (ABP C Voter Opinion Poll) प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 30 जागा तर महाविकास आघाडीला 18 जागांवर यश मिळणार असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी तगडे आव्हान ठेवले आहे. अहमदनगरमध्ये सुजय विखे बाजी मारणार की निलेश लंके गुलाल उधळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार अहमदनगरमधून निलेश लंके हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सुजय विखे पाटलांना यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 



संबंधित बातमी:


ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय अन् कोण पराभूत होणार? मतदारसंघनिहाय संपूर्ण सर्व्हे!