Yogi Adityanath Tweet On Lucknow: उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचे नाव बदलून अयोध्या केल्यानंतर आता राजधानी लखनौचेही नाव बदलण्याची तयारी सुरू आहे का? अशी चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका ट्विटनंतर या चर्चेला उधाण आलं आहे. सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी योगी हे लखनौला पोहोचले होते. या ट्विटमध्ये त्यांनी लखनौ हे भगवान श्री लक्ष्मणाचे पवित्र शहर आहे, असे लिहून पंतप्रधानांचे स्वागत केले होते. यासोबतच त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ते राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासोबत पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना दिसत आहेत.
योगींनी लखनौला 'श्री लक्ष्मणाचे शहर' म्हटले
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना, योगी यांनी ट्वीट करत लिहिले होते की, "शेषावतार भगवान श्री लक्ष्मणजींच्या पवित्र शहरात आपले स्वागत आणि अभिवादन." त्यांच्या या ट्वीटनंतर लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपुरी, लखनपुरी किंवा लखनपूर करण्याची मागणी केली जात आहे. योगी यांनी स्वतः लखनौला लक्ष्मणाचे पवित्र शहर म्हणाले, त्यानंतर त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
विरोधी पक्षांचा भाजपवर हल्लाबोल
लखनौबाबत मुख्यमंत्री योगींच्या या ट्विटवरून आता राजकारण तापले आहे. सपाचे प्रवक्ते फखरुल हसन यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, "भाजपने बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे नाव बदलून विकास केले, भाजपला मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष वळवायचे आहे. जनता मूळ मुद्द्यांपासून विचलित होणार नाही." तर दुसरीकडे काँग्रेसनेही भाजपवर हल्लाबोल केल्याचे दिसून येत आहे. यावर बोलताना उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रवक्ते अशोक सिंह म्हणाले की, यूपीचे योगी सरकार आणि देशातील मोदी सरकार नाव बदलण्यात मग्न आहेत. आज महागाई आणि बेरोजगारी यावर चर्चा होत नाही. देश बेरोजगारीने होरपळत आहे, पण ही दोन्ही सरकारे नाव बदलण्यात व्यस्त आहेत.