Advay Hire : पुढील पाच वर्षानंतर मला आमदार कसे होता येईल याचा मी विचार करत असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी केलं. झालेल्या गोष्टींचा मी विचार करत नाही. निकाल लागला आता काहीही झालं तरी पाच वर्ष काहीही होणार नाही. ही तर जनक्रांती आहे. विजयी झालेल्यांना जास्त आश्चर्य वाटल्याचे गिरे म्हणाले. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून (Malegaon Assembly Constituency) हिरे यांचा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पराभव केला आहे. त्यानंतर आज हिरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे मांडले.


 मी मरेपर्यंत मालेगाव शहरातच राहणार


मालेगाव शहरात माझ्या बद्दल अफवा पसरवल्या गेल्या आहेत. मी मरेपर्यंत मालेगाव शहरातच राहणार आहे. पराभव झाल्यानंतर मी खचून जाणारा माणूस नाही. निवडणुकीत सर्वांनी मला सहकार्य केले आहे. इथून पुढेही मालेगावच्या जनतेबरोबरच राहणार असल्याचे हिरे म्हणाले. काही कारणास्तव मी बाहेरगावी गेलो होतो. मी रोज कृषी उत्पन्न बाजार समितीत असतो असे हिरे म्हणाले. जे माझ्यासाठी तनमनाने लढले त्यांच्यासोबत मी राहणार आहे. पक्ष संघटना बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निवडणुकीमधील पराभव मी स्वीकारतो असे हिरे यावेळी म्हणाले. 


अपूर्व हिरेंनी घेतली अजित पवारांची भेट, अद्वय हिरे म्हणाले...


अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. याबबात बोलताना अद्वय हिरे म्हणाले की, त्यांच्या मतदारसंघातला काही प्रश्न असू शकतो. माझे आणि माझ्या कुटुंबाचे पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. ते सध्या सरकार मध्ये आहेत. अपूर्व हिरे वेगळं काही करतील मला वाटत नाही असेही अद्वय हिरे म्हणाले. त्यांनी त्यांच्या कामासाठी अजित पवार यांची भेट घेतली असेल. त्यांच्या मतदारसंघाचे काही विषय असतील असेही अद्वय हिरे म्हणाले. 


दादा भुसे यांनी पाचव्यांदा मिळवला दणदणीत विजय 


मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील लढत ही अत्यंत चुरशीची मानली जात होती. या मतदारसंघात तिरंगी लढत होती. मात्र या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय मिळवला. अपक्ष फमेदवार बंडूकाका बच्छाव यांचा भुसे यांनी 1 लाख 6 हजार 606 मतांनी पराभव केला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे  उमेदवार अद्वय हिरे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.