मुंबई : राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडली. मात्र, 2021 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये चांगलंच द्वंद पाहायला मिळालं. त्यात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय महाभारत सुरू झाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. एक तर तू राहशील किंवा मी राहील इथपर्यंत टोकाची टीका झाली. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरगच्च यश मिळालं, 237 जागांसह महायुतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुलगा व आमदार आदित्यसह (Aditya Thackeray) देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केलं. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) अद्याप ठाकरे कुटुंबातील कुणीही भेट घेतली नाही, पण देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) आवर्जून अभिनंदन करण्यात आलं. त्यातच, आदित्य ठाकरेंनी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यासंदर्भात आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी स्वत:च दिली.  


वरळी मतदारसंघातील वरळीत राहणाऱ्या पोलीस पत्नी आणि गृहनिर्माणबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. पोलिस निवासात राहणाऱ्या निवृत्त पोलिसांना दंड लावला आहे, तो पर स्केवर फूट 20 रुपये होता तो 150 रुपये केला आहे. तो कमी करावा ही विनंती आम्ही केली, इथे अनेक पिढ्या होत्या त्यांनी, मुंबईची सेवा केली आहे. मागच्या सरकारने 8 दिवसात करु असं वचन दिलं होतं, ते झालं नाही, असे आदित्य यांनी म्हटले. तसेच, निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरं कशी देता येतील त्याबाबत चर्चा केली. याशिवाय मुंबई पोलिसांची निवासस्थानं आहेत, त्यांच्या डागडुजीचा प्रश्न होता, असेही आदित्य यांनी सांगितले. त्यामुळे, राज्याचे गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे आहेत, पण या खात्यासंदर्भातील विषयाची चर्चा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली. विशेष म्हणजे शिवसेनेतील फुटीनंतर, शिवसेना पक्ष व चिन्ह बळकावल्यानंतर एकदाही ठाकरे कुटुंबातील कोणीही एकनाथ शिंदेंना भेटलेलं नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण, व नगरविकास हे दोन्ही खाते आहेत.   




टोरेस घोटाळ्यासंदर्भातही चर्चा


दरम्यान, मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्नही आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडला. सर्वांसाठी पाणी ही योजना आम्ही आणली होती. कोणत्याही सोसायटीचं लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी मिळणं हे हक्काचं आहे, सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईत लागू करावी, त्यावरील स्थगिती हटवावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, आम्ही मोकळ्या मनानं आलो आहोत, अशात यावरील स्थिगिती उठवावी ही मागणी आणली आहे. तर, टोरेस घोटाळ्याप्रकरणीही कारवाई करण्याची मागणी आदित्य यांनी केली आहे.


हेही वाचा


पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या