Devendra Fadnavis & Amruta Fadnavis Majha Katta: ''जनतेने लोकशाही पद्धतीने एक सरकार निवडून दिलं होत आणि त्या सरकारशी बेईमानी झाली. त्यात निवडणून आलेल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून मित्र जेव्हा ज्यांच्या विरोधात निवडून आलेल्या पक्षासोबत जातात. मग एक असे सरकार आले ज्यात वसुली हा एकमेव त्याठिकाणी अजेंडा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात यापेक्षा काय पाहायला मिळेल. महाराष्ट्राची बेअब्रू होत आहे. ज्याप्रकारे बदल्यांमधील घोटाळे समोर आले. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर, महाराष्ट्र पोलीस जो देशात सर्वात उत्तम आहे. त्याची अब्रु वेशीवर टांगण्याचा प्रयत्न होत आहे. ही परिस्थिती बदलायची असले, तर ज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे त्यांचा कोणाशी संवादच नाही आहे'', असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

  


एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बरेच राजकीय आणि आपल्या खासगी आयुष्यातील किस्से सांगितले आहेत.


पुन्हा येईन म्हटलं पण कधी हे म्हटलं नव्हतं: फडणवीस   


महाराष्ट्राच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन', असं म्हटलं होत. त्यांचं हे वाक्य महाराष्ट्रात खूपच गाजलं. त्यावर अनेक मीम्स देखील बनले. मात्र ते असे का म्हणाले होते, यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले आहेत की, ''मी पुन्हा येईन म्हटलं होत ते जनतेच्या विश्वासावर म्हटलं होत. जनतेने पुन्हा आणलं. पण त्यावेळी हे माहित नव्हतं, मी पुन्हा येईनमध्ये काही लोक मधेच खोडा घालू शकतात. पण हरकत नाही. मी पुन्हा येईन असं म्हटलं होत, पण कधी हे म्हटलं नव्हतं. मात्र येईन हे नक्की.   


माझ्यासमोर देवेंद्र यांची बोलती बंद असते: अमृता फडणवीस


यावेळी कट्ट्यावर बोलताना अमृता फडणवीस हे अशाच बोलणाऱ्या देवेंद्र यांच्या प्रेमात पडल्या होत्या का? असं विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या आहेत की, मी न बोलणाऱ्या देवेंद्रच्या प्रेमात पडली होती. ते बाहेरच बोलतात. माझ्यासमोर त्यांची बोलती बंद असते, असं अमृता फडणवीस बोलताच एकच हशा पिकला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोक प्रामाणिकपणे मान्य करतात की त्यांची पत्नीसमोर बोलती बंद होते. तर काही लोक मान्य करत नाही. 99 टक्के पती असे असतात ज्यांची बोलती बंद होते. जे 1 टक्के असतात त्यांना वेगळं व्हावं लागत. 


म्हणून मी देवेंद्र यांच्याशी लग्न केलं: अमृता फडणवीस  


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटलं होत का? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला असता, त्या म्हणाल्या की, मला नव्हतं वाटलं की ते मुख्यमंत्री होऊ शकतात. लग्नाच्या आधी राजकारणाबद्दल मला जास्त ज्ञान नव्हतं. लग्न झाल्यानंतर मला थोडं फार राजकारण कळायला लागलं. त्यावेळी इतकंच माहित होत की, हा चांगला माणूस आहे. मला पूर्ण फ्रिडम देतो आणि माझ्या आईच घर शेजारीच आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवून मी लग्न केलं होत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांच्या घरी कोणालाच आमदार म्हणजे नेमकं काय, हे देखील माहित नव्हतं. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, आमचं व्होटर कार्ड लग्नानंतर बनवण्यात आलं आहे. ही चांगली गोष्ट नाही. आपल्याला हे ज्ञान असायला हवं. मात्र आम्ही तसे होतो, हे सांगताना मला वाईट वाटत आहे.   


ट्रोलिंगमुळे माझ्यातील स्त्री शक्तीचा जागर झाला: अमृता फडणवीस  


सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवरून अमृता फडणवीस म्हणाल्या की, ''त्रिशंकू सरकारच्या समर्थकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगमुळे माझ्यातील स्त्री शक्तीचा जागर झाला. मी असेच स्वतःचे विचार व्यक्त करत राहील आणि तुम्ही ट्रोल करत राहा हीच विनंती.'' ट्रोलर्स तुम्हाला मामी म्हणतात याचं तुम्हाला वाईट वाटतं का, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, मला मजा वाटते. जीवनात कधी लो वाटलं, तर मीम्स पाहायचे. मग फार छान वाटत, असं त्या म्हणाल्या आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ट्रोलिंगमुळे मला कधीकधी दुःख होत. पण तिला नाही होत आणि ती घाबरत ही नाही. तिची सर्व मते मला पटतात, असे नाही. माझी अपेक्षा असते की, तिने पोलिटिकल ट्वीट करू नये. मात्र अर्थात तिची मते तिची आहेत. 


तुटलेल्या मैत्रीचं जास्त दुःख की फसलेल्या मैत्रीचं जास्त दुःख? 


तुम्हाला तुटलेल्या मैत्रीचं जास्त दुःख की फसलेल्या मैत्रीचं जास्त दुःख आहे, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला असता, यावर त्यांच्या ऐवजी अमृता फडणवीस यांनी उत्तर देत म्हटलं की, फसल्यामुळेच तुटली आहे. यावर फडणवीस म्हणाले, राजकारणात या अशा गोष्टींसाठी तयार राहावं लागतं. जे झालं ते झालं, समोर पाहायचं आणि पुढे चालायचं. 


माझ्यानंतर माझ्या कुटुंबातील कोणीही राजकारणात येणार नाही: देवेंद्र फडणवीस 


अमृता फडणवीस राजकारणात येतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या आहेत की, राजकारणात यायची माझी जराही इच्छा नाही. माझं सामाजिक काम, मी सुरळीत करत आहे. जिथे समस्या आहेत असं मला वाटत, तिथे जाऊन मी पुढाकार घेऊन काम करते, असं त्या म्हणाल्या आहेत. यावरच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सक्रिय राजकारणात माझ्या घरातला मी शेतवचा असेल, दुसरा कोणी नसेल. मला वाटत नाही माझ्या घरातील कोणीही राजकारणात येईल. माझ्या कुटुंबातला मी शेवटचा असेल.


देवेंद्र फडणवीस खरंच 35 पुरणपोळ्या खायचे का? 


मी जिथे जातोय तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहेत, असं वैतागून देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की, ''आमचं जन्मात कधी भांडण झालं नाही आहे. मात्र आता सगळीकडे लोक त्यांना पुरणपोळी देतात, मग ते घरी येऊन माझ्यावर चिडतात. म्हणून मला स्पष्ट करावं लागेल की, देवेंद्र यांच्या लहानपणीचे एक मित्र आहे. त्यांनी लग्नाआधी मला सांगितलं होत की, देवेंद्र यांनी एका स्पर्धेत, लग्नाच्या पंक्तीत 30 ते 35 पोळ्या खाल्या आणि ते जिंकले. मात्र लग्नानंतर माझ्यासमोर त्यांनी अर्धी पूणपोळी देखील खाली नाही.'' यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''एबीपी माझ्यावरून मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की, मला पुरणपोळी आवडत नाही. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी नको.''