Exit Poll Result 2024 नागपूर : देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) मतदानाची रणधुमाळी आज संपुष्टात येत आहे. देशात शनिवारी लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडत आहे. त्यानंतर येत्या  4 जून रोजी देशात सत्ता कुणाची येणार हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी हे मतदान संपत असताना सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची (Exit Poll 2024) आकडेवारी जाहीर झाली आहे. यापैकी एबीपी-सी व्होटर (ABP-CVoter या देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह एक्झिट पोलकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


एबीपी-सी व्होटरच्या आजच्या एक्झिट पोलमध्ये टप्याटप्प्याने प्रत्येक राज्याचा निकाल जाहीर झाला. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोल्सचे सर्वेक्षण देशातील सर्वात अचूक मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये गणले जाते. त्यातच महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी वरचढ ठरणार, याचा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. 


महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट


एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला 9 जागा मिळतील, अशी शक्यता आहे. याशिवाय शिंदे गटाला सहा जागा आणि अजित पवार गटाला एक जागा मिळू शकते. शरद पवार गटाला सहा जागा आणि काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळू शकतात, असं एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे.


एबीपी सी वोटर एक्झिट पोल


महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जात आहे. तर, महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मविआ आणि महायुतीत 50-50 संधी असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतंय. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाला 9 जागा, काँग्रेसला 8 जागा तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महायुतीत भाजपला 17 जागा, शिंदे गटाला 6 जागा आणि अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.


नागपूरसह विदर्भातील उमेदवारांचा निकाल काय?


महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला विदर्भापासून सुरवात झाली. यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला  मतदान प्रक्रिया पार पडली. तर दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील उर्वरित पाच मतदारसंघात मतदान झाले. विदर्भातील सर्वात चर्चेची आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात यंदा सलाग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री आणि भाजपेचे दिग्गज नेते नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात होते. नितीन गडकरी आपल्या विकासकामांच्या जोरावर बहुमताने विजयी होतील, असा दावा भाजपने केला होता. तर दुसरीकडे त्यांच्या विरुद्ध महविकास आघाडीने देखील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना मैदानात उतरवत ही निवडणूक अधिक रंगत केली.


मात्र कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपूर मतदारसंघात विकास ठाकरे विजयी पताका फडकवतील, की महायुतीचे नेते नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा विजयाची हट्रिक करतील? याबाबत साऱ्यांना उत्सुकता आहे. मात्र, टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशातच पूर्व विदर्भात मात्र भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Election 2024) भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे पिछाडी वर असल्याचा अंदाज टिव्ही 9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार सांगण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.