Abhimanyu Pawar: विधानसभा निवडणूकीत सरशी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी अनेक भाजप नेत्यांनी इच्छा व्यक्त केली, काहींनी तर नवस केले. आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महिना उलटत आल्यानंतर भाजपच्या आमदारानं सहपत्नी चालत जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेत नवस फेडलाय. औशाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar)यांनी सहपत्नी नवसपूर्ती यात्रा करत तुळजाभवानी चरणी 65 किमीचं अंतर कापत माथा टेकवलाय. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड पश्चिम महिन्याचं येणार पाणी या प्रकल्पांची पूर्तता व्हावी यासाठी अभिमन्यू पवार यांनी तुळजाभवानी मातेला नवस केला होता. फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) झाल्याने पवार यांनी कार्यकर्त्यांसह यात्रा काढत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतलं. आता अर्धनवस पूर्ती झाली असून मराठवाडा वॉटर ग्रीड आणि पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्यात येऊन लवकरच पूर्ण नवस पूर्ती होईल विश्वास अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला. इन्फ्रामॅन अशी ओळख असलेले देवेंद्र फडणवीस पाच वर्षात मराठवाड्यातील प्रकल्प पूर्ण करतील असं पवार म्हणाले.


औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तुळजाभवानीला नवस बोलला होता. जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुळजापूर पायी जाऊन दर्शन घेणार असा नवस ते बोलले होते. आता याच नवसाची पूर्तता करण्यासाठी अभिमन्यू पवारांनी बुधवारी औशापासून तुळजापूरपर्यंत पायी नवसपूर्ती पदयात्रा काढली होती. आज त्यांच्या पदयात्रेचा शेवटचा दिवस आहे.अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे आणि फडणवीस युतीत असताना औसा मतदारसंघ ठाकरे गटाकडे होता.हा मतदारसंघ भाजपने ताब्यात घेतला. विधानसभेत ठाकरे गटाचे दिनकर माने यांचा 34 हजाराच्या फरकाने पराभव करत अभिमन्यू पवार आमदार झाले. जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर औसा ते तुळजापूर पायी पदयात्रा करून दर्शन घेऊन नवस पूर्ण करण्याची घोषणा त्यांनी केली होती. 


 काय म्हणाले होते अभिमन्यू पवार?


भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आज सोनियाचा दिन आहे. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही पाच वर्षापासून करत होतो. देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी म्हणून मी 25 वर्ष काम केले, या काळात नेता, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशा सगळ्या रोलमध्ये देवेंद्र फडणीस यांनामी बघितलं आहे. देवेंद्र फडणवीस अस्सल 24 कॅरेट सोनं आहे, किती संयम त्यांनी ठेवावा, किती सहन करावं. जे टोमणे, ज्या शिव्या देवेंद्र फडणीस यांनी मागील पाच वर्षात खाल्ल्या, त्यातून निघालेले हे मंथन आहे, अशा शब्दात अभिमन्यू पवार यांनी आजच्या दिवसाचं वर्णन केलं आहे. मी तुळजापूरच्या देवीला नवस केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ दे... आता तो नवस पूर्ण झाला आहे, आणि तो नवस फेडण्यासाठी मी औसा ते तुळजापूर चालत जाणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.