अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून तिकीट जाहीर झाले आहे. मात्र त्यांच्या नावाला महायुतीचा घटकपक्ष असेल्या प्रहार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून विरोध होत आहे. प्रहार जनशक्ती (Prahar Janshakti) पक्षाचे प्रमख बच्चू कडू (Bacchu Kadu) हे राणा यांच्याविरोधात उमेदवार देणार आहेत. त्यानंतर आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ (Anand Adsul) यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ (Abhijit Adsul) यांनीदेखील राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. त्यांनी राणांच्या उमेदवारीला थेट विरोध केला असून वेळ आली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे, असं त्यांनी सांगितलंय.  


अभिजित अडसूळ नेमकं काय म्हणाले?


अभिजित अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अमरावतीत योग्य व्यक्तीला तिकीट देण्यात आलेले नाही, असे अडसूळ म्हणाले आहेत. आम्ही याआधीही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. नवनीत राणा यांचा जातीचा दाखला खोटा आहे. अमरावतीतील भाजपच्या कार्यकर्त्यांचा राणा यांना विरोध आहे. राणा यांना बच्चू कडू यांनीदेखील विरोध केलेला आहे. त्यांना राष्ट्रवादी, आमचादेखील विरोध आहे. मला वाटतं हे तिकीटवाटप चुकीच्या पद्धतीने झाले आहे, अशा भावना अडसूळ यांनी व्यक्त केल्या. 


तिकीट तर मिळालं पण...


आम्हाला सांगूनच अमरावतीच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र असे न करता राणा यांच्या उमेदवाराची घोषणा एकतर्फी झालेली आहे. अमरावतीत नेते, कार्यकर्त्यांच्या मनात खदखद आहे. भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता खुश नाही. भाजपचा एकही कार्यकर्ता राणा यांचं काम करेल असं मला वाटत नाही, असे अभिजित अडसूळ म्हणाले. तसेच तिकीट तर राणा यांना मिळाले आहे. मात्र निवडणूक लढवणे तेवढे सोपे नाही,असे म्हणत अभिजित यांनी राणा यांना एका प्रकारे इशाराच दिला आहे.


वेळ आली तर...


आम्ही सर्वपक्षीय नेते एकमेकांच्या संपर्कात आहोत. आम्ही बैठका घेत आहोत, चर्चा करत आहोत.वेळ आलीच तर राणा यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच निर्णय घेऊ, असे म्हणत अभिजित यांनी लोकसभा निवडणकू लढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे आगामी काळात अभिजित अडसूळ नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


महायुती विरोधाला कसे तोंड देणार?


दुसरीकडे प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांनीदेखील नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मी अमरावतीमध्ये उमेदवार देणार आहे. किंवा आम्ही योग्य उमेदवाराला पाठिंबा देऊ, अशी भूमिका कडू यांनी घेतली आहे. त्यामुळे या विरोधाला महायुती कसे तोंड देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.