Lok Sabha Election 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्याचा प्रस्तावाला नकार दिला आहे. यामागचे कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक पैसे नसल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. याची माहिती स्वतः निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली आहे. विशेष म्हणजे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी त्यांना आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) किंवा तामिळनाडूमधून (Tamil Nadu) निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता.


देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. भाजपने देशभरात पक्षातील महत्वाच्या अनेक नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहेत. ज्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. अशात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षाकडून विचारणा करण्यात आली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. मात्र, बराच विचार केल्यावर सीतारामन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी लागणार आवश्यक एवढा पैसा नाही, त्यामुळे मी निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी पक्षाला सांगितले आहे. 


10 दिवस विचार करून निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला


एका कार्यक्रमादरम्यान बोलतांना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली होती. मला आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा पर्याय देखील देण्यात आला होता. यासाठी मी एक आठवडा किंवा 10 दिवस विचार केला. त्यानंतर मी निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला. आंध्र प्रदेश असो किंवा तामिळनाडू, माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी एवढा पैसा नाही, असे सीतारामन म्हणाल्या. 


देशाचा पैसा माझा वैयक्तिक निधी नाही


जेव्हा सीतारामन यांना विचारण्यात आले की, देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा पैसे का नाही?, यावर उत्तर देतांना त्या म्हणाल्या की, भारताचा एकत्रित निधी (अर्थखात्याचा निधी) हा माझा वैयक्तिक निधी नाही. माझा पगार, माझी कमाई आणि माझी बचत माझी आहे. भारताचा एकत्रित निधी माझा नाही, असे सीतारामन म्हणाल्या. 


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संपत्ती किती?


केंद्रात मंत्री असलेल्या काही नेत्यांची संपत्ती पाहून सर्वसामान्य व्यक्तीची डोळे फिरतील. मात्र असे असतांना इतर मंत्र्यांच्या तुलनेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संपत्ती खूप कमी आहे. सीतारामन यांच्याकडे सुमारे 1.34 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सीतारामन आणि त्यांच्या पतीच्या नावावर असलेल्या घराची किमंत 99.36 लाख रुपये असून, याशिवाय त्यांच्याकडे सुमारे 16.02 लाख रुपयांची बिगर शेती जमीन सुद्धा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मासिक वेतन सुमारे 4,00,000 रुपये आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nitin Gadkari Property : नेहमी कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्या गडकरींची स्वतःची संपत्ती किती?; पाच वर्षांत 51 टक्क्यांनी वाढ