Agricultural and Cultural Festival in Madha : माढा विधानसभेची (Madha Vidhansabha) रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका बाजूला रणजितसिंह शिंदे यांनी जयंत पाटलांची भेट घेऊन तुतारीसाठी प्रयत्न सुरू केले असतानाच दुसरे स्पर्धक असणारे अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी माढ्यात कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करत मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.  विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा कार्यक्रम होत असून यामध्ये मानसी नाईक, भाऊ कदम, मकरंद अनासपुरे, कीर्तनकार इंदुरीकर महाराज, गायक आनंद शिंदे अशा सेलिब्रेटींना माढ्यात आणून पाच दिवस जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माढ्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटी येणार असल्याने नागरिकांनाही हास्याची व करमणुकीची जोरदार मेजवानी मिळणार आहे. 


माढा कृषी व संस्कृती महोत्सवात कोणकोणते कार्यक्रम असणार?


माढा कृषी व संस्कृती महोत्सव  दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार असून या महोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य शामियाना आणि मंडप पूजन अभिजीत पाटील यांच्या हस्ते पार पडले. शनिवार  12 ते बुधवार 16 ऑक्टोबर या पाच दिवस चालणाऱ्या कृषी व सांस्कृतिक महोत्सवामध्ये कृषी विषयक तज्ञांचे मार्गदर्शन, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत संस्कृती कार्यक्रम तसेच साहित्य आणि प्रदर्शन येथील नागरिकांना पाहावयास मिळणार आहे. या महोत्सवाची सुरुवात शनिवारी  दसऱ्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता भव्य शेतकरी मेळाव्याने होणार आहे. या दिवशी दसरा असल्याने सायंकाळी 6 वाजता रावण दहन या कार्यक्रमाचे करण्यात आले आहे. तसेच रविवार  13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे मार्गदर्शन तर सायंकाळी ६ वाजता अभिनेत्री मानसी नाईक यांचा महाराष्ट्राचे हास्यवीर कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे मार्गदर्शन तसेच सायंकाळी 6 वाजता ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन व भारुड कार्यक्रम होणार आहे. 




15 ऑक्टोबरला भाऊ कदम व मकरंद अनासपुरे येणार


मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नफ्यातील दुग्ध व्यवसाय या विषयावर गंगाप्रसाद पाटील यांचे मार्गदर्शन आणि सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे कॉमेडी कलाकार भाऊ कदम व मकरंद अनासपुरे यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांना याचा आनंद घेता येणार आहे.  शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अरुण देशमुख कृषी विद्या विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन व सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचा महागायक आनंद शिंदे यांचा लोकगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.


पुढील दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता


निवडणूक आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच माढ्यातील वातावरण हलके करण्याचा प्रयत्न अभिजीत पाटील यांनी केला आहे. आता माढ्यातील जनता या सेलिब्रेटींना किती प्रतिसाद देते आणि यातून अभिजीत पाटील काय साधणार हे निवडणूक लागल्यावरच समजणार आहे. तसे पाहता पुढील दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पाटील यांचा हा कार्यक्रम आचारसंहितामुळे रद्द होणार की त्यांचे विठ्ठल प्रतिष्ठान हे तसेच सुरू ठेवणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी माढ्यातील मतदारांना अशा विविध सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांची मेजवानी मात्र निवडणुकीच्या निमित्ताने मिळणार आहे.


महत्वाच्या बातम्या :


Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला