Aaditya Thackeray Tweet on Mumbai Roads : मुंबई : मुंबईसह (Mumbai News) उपनगरांत शनिवारपासूनच मुसळधार पावसानं (Rain Updates) हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तर लोकलवरही त्याचा परिणाम होत असल्याचं दिसत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हाच फोटो ट्वीट करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह संपूर्ण सरकारवर निशाणा साधला आहे. 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केलं. या ट्वीटमार्फत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर टीका केली. ट्विटर हँडलवरुन आदित्य ठाकरेंनी एक क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये मुंबई आणि मीरा भाईंदर येथील रस्त्यांवरील खड्डे पोलीस कर्मचारी भरत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आदित्य ठाकरे यांनी शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 






ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरे म्हणाले की, "शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मालकीच्या कंत्राटदार आणि कंपन्यांऐवजी पोलीस खड्डे का भरत आहेत याचे मला आश्चर्य वाटतंय." पुढे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, "भाजप आणि मोदी सरकारच्या कंत्राटदार मित्रांऐवजी, खड्डे भरण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तुम्ही कधी पाहिलं आहे का? सरकार खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार किंवा कंत्राटदार कंपनीच्या मालकांची नियुक्ती करत आहे?" 


दरम्यान, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना 'मिंधे' असा उल्लेख केला आहे. तसेच, शिवसेनेच्या शिंदे गटावर भाजपचं नियंत्रण असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. पोलिसांकडून खड्डे बुजवण्यात येत असलेल्या व्हिडीओ क्लिपवर आदित्य ठाकरेंनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला टॅग केलं आहे. तसेच, "NHAI ची खरंच लाज वाटतेय.", असं म्हटलं आहे. 


मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट 


हवामान खात्यानं सोमवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली असून थोड्याथोड्या अंतराने मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी कार्यालयात आणि दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.