पालघर : अमित शाह यांनी जरी 40 जागा जिंकण्याचा दावा केला असला तरी यावेळी त्यांना महाराष्ट्रातून एकही मत मिळणार नाही, भाजप हा महाराष्ट्रद्वेषी पक्ष आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली. तसेच भाजपने ज्याच्यासाठी मतं मागितली त्यांनी आता प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडलवर (Prajwal Revanna Sex Scandal) बोलावं असं आव्हानही त्यांनी दिलं. पालघरमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी (Bharti Kamdi) यांनी अर्ज भरला. त्यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते.
महाराष्ट्रातून यावेळी जास्त काही बदल होणार नाही, गेल्या वेळच्या जागांपेक्षा एक-दोन जागा जास्त येतील किंवा कमी येतील असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाहांनी केलं होतं. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजप हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे. त्यांनी महाराष्ट्र विरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना आता राज्यातून एकही मत मिळणार नाही.
भाजपने प्रज्ज्वल रेवण्णावर बोलावं
शिवसेनेच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा सहभाग असल्याचा भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आरोप केला होता. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, चित्रा वाघ यांच्यावर मी काही बोलणार नाही, त्यांना इतर नेते उत्तरं देतील. पण भाजपने आता प्रज्ज्वल रेवण्णावर बोलावं. ज्या प्रज्ज्वल रेवण्णासाठी मोदींनी मतं मागितली त्याने इतकं नीच काम केलं. आपल्या देशातल्या महिला त्यामुळे सुरक्षित नाहीत. केंद्र सरकारमध्ये भाजप असताना त्यांनी प्रज्ज्वल रेवण्णाला देशाबाहेर का जाऊ दिलं याचं उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्यावं. असा राक्षसी माणूस त्यांच्या बाजून निवडणुकीला उभा राहिला तरी भाजपामधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही.
जे डरपोक सोडून गेले त्यामुळे फटका नाही
शिवसेनेतून जे डरपोक लोक आम्हाला सोडून गेले, त्या गद्दारांमुळे आम्हाला काही फटका बसणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आले आहोत, भारताचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पालघर लोकसभेचा महायुतीने अजूनही उमेदवार जाहीर केला नसून ईडी, सीबीआय आता कोणता उमेदवार ठरवते हे पहावं लागेल असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
भारती कामडी यांनी अर्ज भरला
पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडींनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, आमदार सुनील भुसारा आणि आमदार विनोद निकोले जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं, शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
पालघर लोकसभेसाठी आतापर्यंत बहुजन विकास आघाडीकडून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ही जागा भाजपला जाणार की शिंदेंच्या शिवसेनेला हे अद्याप स्पष्ट नाही. पालघरमधून राजेंद्र गावित हेच महायुतीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. पण या जागेवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. येत्या एक दोन दिवसात पालघरची जागा कुणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पालघर लोकसभेत आपणाला तिरंगी लढत पाहायाला मिळणार आहे.
ही बातमी वाचा: