मुंबई: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच नारायण राणे करत होते. पण ते दुर्दैवाने पुरावे देऊ शकले नव्हते. परंतु, शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे, ही गंभीर बाब आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना याबाबत थोडीतरी लाज असती तर ते दोघेही आतापर्यंत देश सोडून गेले असते, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas kadam) यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणात ठाकरे पितापुत्रांवर गंभीर आरोप केले. पोलिसांना हाताशी धरुन उध्दव ठाकरे यांनी पुरावे नष्ट केले आहेत का, याची चौकशी व्हायला हवी. मुलाला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना फोन केल्याची चर्चा होती, असेही रामदास कदम यांनी म्हटले. दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला तर याचा खोलवर तपास होईल, असे रामदास कदम यांनी म्हटले.
दिशा सालियन हिच्या वडिलांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर केली होती. यामध्ये त्यांनी आपली मुलगी दिशा सालियन हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असून यामध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी. दिशाच्या हत्येनंतर रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे 44 फोन कॉल झाले होते, असेही दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी विधिमंडळात आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. सामान्य व्यक्तीला जो न्याय आहे, तोच आदित्य ठाकरे यांना लावावा. याप्रकरणात आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक करुन त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे आणि शंभुराज देसाई यांनी केली.
एखाद्या माणसाच्या आयुष्याशी किती खेळायचं? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
पाच वर्षापासून दिशाहीन झालेले पुन्हा 'दिशा'वर आले. विधानभवनात आपण जनतेचे प्रश्न मांडायला येतो. असे विषय काढून महाराष्ट्रातील वातावरण अशांत ठेवले जात आहे. एखाद्या माणसाच्या आयुष्याशी किती खेळायचं. आमच्या वतीने काल सुधीर मुनगंटीवार बोलले. एसआयटी स्थापन होऊन परत तोच प्रश्न काढला जातो. संजय गायकवाड आणि सुधीर मुनगंटीवार या प्रकरणात जे बोलले, ते योग्य आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
आणखी वाचा
आदित्य ठाकरेंवर आरोप होताच करुणा शर्मा मैदानात; 'त्या' संवेदनशील प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाल्या...