Shiv Sena vs Shinde Group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात रात्री 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी पावणे दोन तास बैठक झाली. मुंबईतील प्रभादेवी इथल्या राड्यानंतर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तसंच राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा?
मुंबईतील प्रभादेवी इथे शिंदे आणि ठाकरे गटात राडा पाहायला मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टनुसार कारवाई करण्यात आल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्था यावर देखील खलबतं झाल्याचं समजतं. गृहविभागतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत, त्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.


प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये राडा 
गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.


वादाचे कारण काय?
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. 


संबंधित बातम्या


Shivsena Prabhadevi Rada : प्रभादेवी राडा: सदा सरवणकर यांचा कट्टर समर्थक ते विरोधक; महेश सावंत आहे तरी कोण?


शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र, प्रभादेवी येथील राड्यानंतर उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचं कौतुक