पुणे : मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) मागून कोण बोलतंय हे लवकरच समोर येईल. तसेच, निवडणुका आल्या की, जातीय तणाव निर्माण होतो. त्यामुळे यामागे कोण आहे हे देखील लवकरच स्पष्ट होणार असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहे. यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. “मराठा समाजातील मुलांचं कल्याण व्हायला लागलं की, अशा खोट्या पुड्या सोडल्या जातात. यामागे कोण आहे हे राज ठाकरेंनी शोधून काढावं," असे जरांगे म्हणाले आहेत. 


दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "खरच यामागे कोण आहे हे राज ठाकरेंनी शोधून काढावं. तसेच लवकर याबाबत स्पष्ट देखील करावं. यामागे कोण आहे याबाबत आम्हाला देखील ऐकायचं आहे. यापूर्वी सर्वांनी शोधलं आहे, आता तुम्ही देखील शोधावं. तसेच याबाबत आम्हाला देखील सांगावं, कारण याबाबतचा आम्हाला देखील अजून शोध लागला नाही. मराठा समाजातील मुलांचं कल्याण व्हायला लागलं की, अशा खोट्या पुड्या सोडल्या जातात. मात्र, मराठा समाज आता कुणाचही ऐकणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि आम्ही ते मिळवणारच हे आता समाजाला माहित झालं आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.


बातम्या पेरल्या जाऊ शकतात.


आम्हाला आरक्षण मिळतंय आणि मिळणारच आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणतेही संभ्रम करून घेण्याची गरज नाही. आरक्षण मिळणार असल्याने अशा काही बातम्या पेरल्या जाऊ शकतात. मराठा कुणबीच्या नोंदी सापडत आहे, याबाबतचा अहवाल तयार होत आहे, त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी ओबीसीमधून आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण लक्षात आले असून, त्यामुळे पूर्ण ताकदीने यात समाज उतरला आहे. कुणी काहीही गैरसमज केला तरी तो मराठा समाजाने करून घ्यायचा नाही. आरक्षण आपल्याला मिळणारच आहे आणि आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं, असे जरांगे म्हणाले. 


सभांना राजेंचा विरोध असूच शकत नाही...


सातारा येथील होणाऱ्या आमच्या सभेला राजेंनी विरोध केलं असं कधीच होणार नाही. राजे हे आमचे दैवत आहे. कार्यक्रम घेऊ नका असे राजे कधीच म्हणणार नाही. त्यामुळे ते असं काही म्हटले असेल यावर मला विश्वास बसत नाही. तरीही, राजे जे काही म्हणतील ते सर्व काही करायला मी तयार आहे. समाजाला न्याय मिळत आहे आणि अशावेळी राजगादी असं काही बोलेल असे होऊ शकत नाही. व्हिडिओ पाहिल्यावरच मी यावर बोलेल. गोरगरिबांच्या कल्याणाचा विषय असल्याने असं काही राजे बोलू शकत नाही, असे जरांगे म्हणाले.


आमचं ओबीसीमध्येच आरक्षण 


पन्नास टक्केच्या वरती आम्ही कधीच आरक्षण मागितलं नाही. सरकार काहीही चर्चा करेल. पण, अशा चर्चा मराठयांनी बंद केल्या आहेत. आमचे प्रमाणपत्र सापडले आहे आणि आमचं ओबीसीमध्येच आरक्षण आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसीत आहे. 50 टक्केमध्ये तुम्हीच आरक्षण घ्यावे, आम्हाला आरक्षण कसं देत नाही हे आता आम्ही 24 डिसेंबरालाच पाहणार असल्याचं जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच समोर येईल : राज ठाकरे