मुंबई: यंदाची लोकसभा निवडणूक ही काहीशी आगळी वेगळी ठरणारी असेल. या निवडणुकीत पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगळेच राजकीय समीकरण तयार झालं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक गट भाजपसोबत सत्तेत आणि दुसरा गट काँग्रेससोबत विरोधी पक्षात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला अनुक्रमे तुतारी आणि मशाल चिन्ह मिळालं. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच मशाल हे नवीन चिन्ह तर राष्ट्रवादीची स्थापना करणाऱ्या शरद पवार यांना तुतारी या नव्या चिन्हासोबत निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. 


कोकणातून शिवसेनेचं धनुष्यबाण हद्दपार


दोन दिवसांपूर्वी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली ती शिवसेनेच्या धनुष्यबाणाची. कारण पहिल्यांदा तळ कोकणात शिवसैनिक हे धनुष्यबाणावर नाही तर भाजपच्या कमळ चिन्हावर मतदान करणार आहेत. त्यामुळे मागील 20 वर्षांची धनुष्यबाणावर मतदान करण्याची परंपरा खंडीत होणार आहे. 


रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडे तर रायगड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण हे चिन्ह मतदान यंत्रावर यंदा पाहायला मिळणार नाही. 


यंदा पहिल्यांदा घडणाऱ्या घटना


1) 20 वर्षानंतर पहिल्यांदा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये धनुष्यबाण मतदान यंत्रावर नसेल.
2) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा सातारा आणि भंडारा गोंदिया मतदारसंघातून घड्याळ चिन्ह हद्दपार झालं. 
3) ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्हाव्यतिरिक्त इतर चिन्हावर मतदान करणार. 
4) भिवंडीतून पहिल्यांदा काँग्रेसचा हाताचा पंजा हद्दपार होणार.
5) शिवेसना पहिल्यांदा 20 पेक्षा कमी जागांवर लढणार आहे.
6) स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वर्ध्यातून काँग्रेसचा पंजा गायब होणार. यवतमाळ वाशिमध्ये काँग्रेसचा उमेदवार नसेल. 
7) परभणी मतदारसंघात 35 वर्षानंतर धनुष्यबाण चिन्ह गायब.
8) दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम मधून काँग्रेसचं चिन्ह गायब होणार. 
9) राज्यातील प्रमुख पक्षांकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही. 
10) 20 वर्षानंतर पहिल्यांदाच अमरावतीत काँग्रेसचा पंजा मतदान यंत्रावर असेल. 


एकंदरीतच यंदाची निवडणूक ही विविध कारणाने महत्त्वाची ठरणार आहे. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन महत्त्वाच्या पक्षांना प्रचंड तडजोड करावी लागणारी ठरणार आहे. या तडजोडीच्या राजकारणाचा परिणामी आगामी काळात विधानसभा निवडणुकींवर देखील पाहायला मिळेल. 


ही बातमी वाचा: