मुंबई : शेतकरी संपाचा आज चौथा दिवस आहे. पण या आंदोलनाची कास आता राजकीय पक्षांनी धरल्याचं दिसतंय. कारण आज राज्यातल्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीने सक्रीय साथ दिल्याचं दिसून आलं.


उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार बंद पाडला. यावेळी शेतमाल विक्रेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

दुसरीकडे सत्तेतला वाटेकरी असलेल्या शिवसेनेच्या युवासेनेने आज उस्मानाबादमध्ये चक्काजाम केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सत्ता सोडा अशा घोषणा खुद्द युवासैनिक देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय बळ मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.

राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या :

साडेबारा ते साडेचार, 'वर्षा'वर नेमकं काय घडलं?


शेतमाल पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न, संनियंत्रण कक्षाची स्थापना


एसटीतून दूध, भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यास बंदी!