लंडन : पावसाच्या लपंडावानंतरही टीम इंडियाने चुरशीच्या लढतीत पाकिस्तानवर 124 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा अख्खा संघ भारताने केवळ 164 धावांमध्ये माघारी पाठवला. भारताने पाकिस्तानला विजयासाठी 324 धावांचं आव्हान दिलं होतं.

उमेश यादवने 3, हार्दिक पंड्या 2 आणि रवींद्र जाडेजाने 1, तर भुवनेश्वर कुमारने एका फलंदाजाला माघारी धाडलं. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडाली.

भारताची दमदार फलंदाजी

या महामुकाबल्यात भारतीय फलंदाजांनीही पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि युवराज सिंहनेही पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

युवराजने 53, तर विराटने नाबाद 81 धावा ठोकल्या. युवराज बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्यानेही अखेरच्या षटकात हात धुवून घेतले. त्याने 6 चेंडूत 20 धावा ठोकल्या. याच खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 3 बाद 319 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं आहे. डकवर्थ लुईसप्रमाणे पाकिस्तानला 48 षटकात विजयासाठी 324 धावांचं आव्हान देण्यात आलं. पुन्हा पावसाने सामना थांबवण्याची वेळ आल्यानंतर हा सामना 41 षटकांचा करण्यात आला.

रोहित शर्माचं शतक केवळ 9 धावांनी हुकलं. तो 91 धावांवर बाद झाला. त्याआधी शिखर धवन शानदार अर्धशतक ठोकून 68 धावांवर माघारी परतला. तर युवराज आणि विराटने अभेद्य भागीदारी रचली.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसाच्या अडथळ्यामुळे तीन वेळा थांबवावा लागला. सुरुवातीला हा सामना 48 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्यांदा पावसामुळे खेळ थांबवण्याची वेळ आल्यानंतर हा सामना 41 षटकांचा करण्यात आला. मात्र भारताने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानापुढे पाकिस्तानने अक्षरशः शरणागती पत्करली.

वेगवान शतक ठोकणाऱ्या युवराज सिंहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.