माहेरची साडी पुन्हा सिनेरसिकांच्या भेटीला, सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2017 03:33 PM (IST)
मुंबई : मराठी सिनेजगतात 1991 साली प्रदर्शित झालेल्या माहेरची साडीची अफाट लोकप्रियता आजही कायम आहे. त्यातच सिनेमाचे निर्माते विजय कोंडके या सिनेमाचा सिक्वेल तयार करण्याची घोषणा केली आहे. माहेरची साडी हा मराठी सिनेजगतात 1991 सालात तुफान लोकप्रिय झाला होता. या सिनेमाने त्याकाळी कोट्यवधींची कमाई केली होती. फक्त कमाईच नाही, तर या सिनेमाच्या निमित्ताने अलका कुबल स्टाईल सिनेमांची लाटच इंडस्ट्रीत आली होती. अलका कुबलला सुपरस्टार बनवण्यात माहेरची साडी या सिनेमाचा मोठा वाटा होता. मराठी सिनेमाच्या इतिहासातली ही रेकॉर्डब्रेक माहेरची साडी आता सिक्वेलच्या रुपात परत एकदा आपल्या भेटीला येत आहे. निर्माते विजय कोंडके यांनी या सिक्वेलची घोषणा केली आहे. सिनेमाची कथा आणि पटकथा ठरली असून निर्माते सध्या कलाकारांच्या शोधात आहेत. अलका कुबलला रातोरात स्टार करणारी माहेरची साडी सिक्वेलच्या निमित्ताने कोणाच्या पदरात पडते ते पाहाणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.