पुणे : पुण्याच्या भवानी पेठेतील मिठाईचे दुकान फोडून ड्रायफ्रुट आणि मिठाई चोरून नेणाऱ्या झुरळ्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. झुरळ्या हा अट्टल गुन्हेगार असून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा भंग करून तो शहरात आला होता. आकाश उर्फ झुरळ्या पाटोळे असे त्याचे खरे नाव आहे.
झुरळ्याने 15 तारखेला सकाळी 6 वाजता भवानी पेठेतील मंगलम ड्रायफूट या दुकानांचे शटर फोडून रोख 48 हजार व मिठाईची चोरी होती. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तडीपार गुंडाला समर्थ पोलिसांनी 24 तासात जेरबंद केलं आहे. त्याच्याकडून 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
झुरळ्या हा सराईत गुन्हेगार आहे. खडक आणि समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर 15 हून अधिक गुन्हे नोंद आहेत. त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग करून त्याने शहरात येऊन घरफोडी केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.