नवी दिल्ली: महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूरवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यांमुळे भाजपच्या नेत्यांना देखील टीकेला सामोरे जावे लागत आहे.  साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यामुळे आता खुद्द भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील अडचणीत सापडले. एका कार्यक्रमात उद्योगपती आणि बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांना चांगलेच घेरले. कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या वेळी बजाज यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यावरून शाह यांना सवाल केला.


शाह यांना प्रश्न विचारताना बजाज म्हणाले की, मी स्तुती करण्यासाठी इथं आलेलो नाही. तुम्हाला आवडणार नाही, मात्र माझं नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठेवलं होतं. यूपीए सरकारच्या काळात कुणावरही टीका केली जाऊ शकत होती. मात्र आता तुमच्याविरुद्ध बोलायला लोकं घाबरतात. तुम्ही काम करत आहात मात्र लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य का नाही? असा सवाल बजाज यांनी शाह यांना केला.

राहुल बजाज म्हणाले की,ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्याला देशभक्त म्हटले जाते. याआधीही म्हटले गेले आहे. तुम्ही त्यांनाच तिकीट दिले आणि त्या निवडून देखील आल्या. त्यानंतर त्यांना सुरक्षा सल्लागार समितीमध्ये घेण्यात आले. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, आम्ही त्यांना माफ करणार नाहीत. बजाज यांनी मॉब लिंचिंगचा उल्लेख करत या सर्व मुद्द्यांवर कोणताही उद्योगपती बोलू शकत नाही, असं देखील म्हटलं.

राहुल बजाज यांच्या या प्रश्नानंतर  गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, तुमच्या प्रश्नानंतर कुणी म्हणणार नाही की लोकं प्रश्न विचारायला घाबरत आहे.  शाह म्हणाले की, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं वक्तव्य आल्यानंतर लगेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी माफीही मागितली. भाजप कधीही अशा वक्तव्यांचं समर्थन करत नाही. अशा वक्तव्यांचा निषेधच केला पाहिजे, असे शाह म्हणाले.  शाह यांनी सांगितलं की,  मॉब लिंचिंग च्या अनेक घटनांमध्ये शिक्षा झाली आहे, कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. आमच्या विरोधात खूप लिहिलं गेलं आहे, मात्र कुणीही घाबरू नये, असे शाह म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लोकसभेच्या चर्चेत नथुराम गोडसेला चक्क 'देशभक्त' म्हणत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं सभागृहात गोंधळ झाला होता. लोकसभेत एका चर्चेत महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला चक्क 'देशभक्त' अशी उपाधी दिली होती. ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी आक्षेप घेत विरोध केला होता. मात्र नंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबद्दलच्या विधानाबाबत लोकसभेत खेद व्यक्त करत माफी मागितली होती. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करते असं त्यांनी लोकसभेतील आपल्या निवेदनात म्हटलं होतं. यावेळी त्यांनी महात्मा गांधींजींच्या योगदानाचा आदर असल्याचंही सांगितलं होतं.

हे ही वाचा - 'त्या' विधानाबद्दल अखेर खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली