नवी दिल्ली : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबद्दलच्या विधानाबाबत लोकसभेत खेद व्यक्त केला आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करते असं त्यांनी लोकसभेतील आपल्या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधींजींच्या योगदानाचा आदर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी प्रज्ञासिंह यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता टीकाही केली.  प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात भोपाळमध्ये काँग्रेस आक्रमक झाली होती. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले होते. गोडसेला देशभक्त म्हणणंच देशद्रोहाच्या श्रेणीत येतं असं काँग्रेसचं म्हणणं आहे.


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लोकसभेच्या चर्चेत नथुराम गोडसेला चक्क 'देशभक्त' म्हणत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं सभागृहात गोंधळ झाला होता. लोकसभेत एका चर्चेत महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला चक्क 'देशभक्त' अशी उपाधी दिली आहे. ठाकूरच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी आक्षेप घेत विरोध केला. या वक्तव्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला होता आणि अध्यक्षांनी ते वक्तव्य पटलावरुन देखील काढले होते.

लोकसभेत द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी एसपीजी संशोधन विधेयकावर चर्चा करत असताना  नकारात्मक मानसिकतेचे उदाहरण देताना गोडसेचा उल्लेख केला होतो. यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ए.राजा यांच्या चर्चेचा विरोध केला. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी 'देशभक्तांचं उदाहरण देऊ नका'  असं म्हणत विरोध केला होता. प्रज्ञा सिंह यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसने मोठा विरोध केला होता.

या चर्चेत ए. राजा म्हणाले होते की, गोडसेने स्वतः कबूल केलं होतं की, 32 वर्ष गांधीजींच्या विरोधात त्याच्या मनात द्वेष होता. यामुळे त्याने गांधीजींची हत्या केली. यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी आक्षेप घेतला होता. प्रज्ञा ठाकूर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपच्या खासदारांनी प्रज्ञा ठाकूर यांना खाली बसण्यास सांगितले होते.

प्रज्ञा सिंह यांनी या आधीही अनेक वेळा नथुराम गोडसेला देशभक्त असल्याची उपमा दिली होती.