Ramgiri Maharaj, परभणी : दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्याविरोधात आणखी एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध रामगिरी गुरुनाथ महाराज यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात परभणीतील पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवचनादरम्यान अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत
पाथरी येथील याहिया खान दुरानी यांनी आज पाथरी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिली आहे. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी 16 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजित सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये रामगिरी गुरुनाथ महाराज (रा सरला बेट तालुका वैजापूर) यांनी प्रवचनादरम्यान अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतर मुस्लिम व हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले अशी तक्रार देत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी फिर्याद दिली. यावरून परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यात कलम 299 आणि 302 अन्वये रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महंत रामगिरी म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला
या सगळ्या वादानंतर महंत रामगिरी यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. मी मुस्लीम समाज आणि मोहम्मद पैगंबरांविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, असे त्यांनी सांगितले. मी तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या दीड तासांच्या प्रवचनातील मोजका भाग एडिट करण्यात आला. भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असतो. राजधर्माचे राजाने कसे पालन करावे? अन्याय सहन करू नये, असे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदुंवर अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे, असे मी बोललो. कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही. कोणाला त्रास द्यायचा नाही. पण कोणी देत असेल तर सहन करायचे नाही. आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे. वेगळे काही बोललो नाही, आम्ही शांतताप्रिय आहोत, असे महंत रामगिरी यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या