Parbhani News : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता चांगलाच तापला असून विविध जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलक राजकीय नेत्यांना जाब विचारत आहेत. अशातच परभणीमध्ये आज मराठा आंदोलकांचा रौद्रावतार पहायला मिळालाय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना परत एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला समोर जावं लागलंय. 


परभणीच्या पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेतील सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही मराठा आंदोलकांनी थेट मंचावर जाऊन मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी करणारे निवेदनही यावेळी दिले. मराठा समन्वयकांनी दिलेले निवेदन वाचून दाखवत 29 ऑगस्टपूर्वी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांचा सुफडा साफ करू, असा इशारा मराठा समन्वयकांनी यावेळी दिलाय. 


मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन 


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना यापूर्वी देखील अशाच एका घटनेत मराठा आंदोलकांच्या रोषाला समोर जावे लागले होते. राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेसाठी जयंत पाटील हे लातूर शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शहरातील जय क्रांती महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी जात असताना मराठा समाजातील आंदोलकांनी त्यांना अडवत निवेदन दिलं. मात्र, मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचं जयंत पाटलांनी टाळल्याने आंदोलन आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मराठा समाज बांधवांना जयंत पाटलांपासून वेगळं केलं होतं. 


जळगाव मध्ये छावा संघटनेने सुप्रिया सुळे यांना घातला घेराव 


असाच काहीसा प्रकार आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत देखील घडला आहे. सुप्रिया सुळे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगाव मधील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात छावा संघटनेकडून एक मराठा, लाख मराठाच्या घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांना घेराव घातला.  यावेळी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी या छावा संघटने कडून करण्यात आली. तर सुप्रिया सुळे यांना निवेदनाद्वारे त्यांनी आपली मागणी लावून धरत जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे.


भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे मनोज जरांगे यांच्या भेटीला


भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज आंतरवली सराटी मध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील केज मतदार संघातून संगीता ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपली दावेदारी जाहीर करत भाजपच्या विद्यमान आमदारांपुढे आणि पक्षा पुढं आव्हान उभ केलय. त्यामुळे मनोज जरांगे यांची त्यांनी घेतलेली भेट राजकीय अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे. 


हे ही वाचा