Parbhani News Update : मागच्या पाच दिवसांपासून राज्य सरकारची कसोटी सुरू आहे. परंतु, यामुळे स्थानिक प्रशासन मोकळे पडलेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण परभणीच्या सेलू तहसील कार्यालयच्या आवारात चक्क वाढदिवसाची पार्टी पार पडली आहे. या पार्टीत गाण्यांचा मोठ्या आवाजावर शर्ट काढून पावसात नाचताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ स्थानिक नागरिकांनी शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. शिवाय नागरिकांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.  


तहसील कार्यालयात सामन्य नागरिकांची कामे केली जातात. परंतु, याच तहसील कार्यालयात चक्क एका अधिकाऱ्याच्या वाढदिवसाची जोरदार पार्टी पार पडली. 22 जून रोजी रात्री घडलेला हा प्रकार स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणला आहे. 


22 जून रोजी सेलू तहसीलमधील एका अधिकाऱ्याचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने तहसील कार्यालयाच्या आवारात एक पार्टी झाली. पार्टी सुरु असतानाच पाऊस आला. त्यामुळे पार्टीत सहभागी झालेल्यांनी चक्क शर्ट काढून डान्स केला. शिवाय मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली. स्थानिक नागरिकांना याचा त्रास झाल्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. परंतु, अधिकाऱ्यांनी स्थानिकांचे म्हणणे एकले नाही. शेवटी एकाने या सर्व प्रकाराचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. 


अश्लिल गाण्यांवर दारु पिऊन नाचणार्‍या अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना नागरिकांनी वारंवार सांगून देखील उलट गाण्यांचा आवाज वाढवून धिंगाणा घातल्यामुळे या प्रकरणी जिल्हाधीकारी आणि वरिष्ठांकडे नागरिकांकडून तक्रार करण्यात आली आहे.  
 
जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश  
या सर्व प्रकाराबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे काही जणांनी व्हिडीओसह तक्रार केली आहे. त्यामुळे गोयल यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. "हा प्रकार घडला हे सत्य असून यात नेमके कोण कोण आहेत हे ट्रेस करून, कोणाचा वाढदिवस होता? याची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले गोयल यांनी सांगितले आहे.