मुंबई: परभणीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या करावी वाटते असं स्टेटस ठेवल्याने आणि नंतर तो कर्मचारी गायब झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षकासोबत कामावरून वाद झाल्यानंतर अपमानित झाल्याची भावना या कर्मचाऱ्याच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर आपल्याला आत्महत्येसारखे पाऊल उचलावं वाटतंय असं व्हाट्सअप स्टेटस ठेवून पोलिस कर्मचारी गायब झाला आहे. या पोलिस कर्मचाऱ्याचा शोध घेतला जात आहे.


परभणीच्या पाथरी पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलिस जमादार रफिक मुस्ताक अन्सारी आज सकाळी कामावर हजर होते. त्यावेळी पाथरीत आज निघालेल्या तिरंगा रॅलीत कर्मचारी नियुक्ती आणि या रॅलीच्या माहितीबाबत पोलिस निरीक्षक गणेश राहिरे आणि पोलिस जमादार रफिक अन्सारी यांच्यात वाद झाला. याच वादातून दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर 2 वाजुन 44 मिनिटांनी पोलीस जमादार रफिक अन्सारी यांनी स्वतःच्या व्हाट्सअॅप वर "आज रोजी पोलिस निरीक्षक श्री राहिरे साहेब यांनी मला अपमानित करून मला खूप वाईट वागणूक दिलेली आहे. मला खूप वाईट वाटले, आत्महत्या करावे यासारखे पाऊल उचलावेसे वाटते" असे स्टेटस ठेवले आणि ठाणे सोडले. यांनतर त्यांनी मोबाईल बंद केला. ही बाब पाथरीसह जिल्हा पोलीस प्रशासनात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. 


पोलिस निरीक्षकांचे स्पष्टीकरण 


आज नवरात्रीला सुरुवात होतेय, सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आला आहे, पाथरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मानवत येथे बंदोबस्तासाठी गेलेले आहेत. त्यामुळे आज सकाळी पाथरीत तिरंगा रॅली निघाली. त्याची माहिती आणि स्टेशन डायरीत बंदोबस्त नोंद घेण्याबाबत मी त्यांना सांगितले. मात्र त्यांनी त्यालाच अवघड मानलं आणि असे केले. परंतु आमच्यात वाद झाला नाही. ते येतील, आम्ही त्यांना शोधतोय अशी प्रतिक्रिया पाथरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


तसेच आम्ही याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी अबिनाश कुमार यांच्याशी बोललो असता त्यांनीही पोलिस जमादार यांनी स्टेटस ठेवून निघून गेल्याचे सांगितले. मात्र ते कुठेही जाणार नाहीत, काहीही पाऊल उचलणार नाहीत, आम्ही त्यांची समजूत काढू आणि त्यांचे नेमके काय म्हणणे आहे हे पाहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.