परभणी: परभणीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तिसरी ही मुलगी झाल्याने संतापलेल्या पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आपला जीव वाचविण्यासाठी धावताना घरासह महिलेसह दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. तिसरी देखील मुलगीच झाल्यामुळे पतीने आपल्या पत्नीवरती राग काढला. त्याचबरोबर तो वारंवार आपल्या पत्नीला शिवीगाळ करायचा, मारहाण करून तो तिच्याशी भांडायचा. गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना कुंडलिक काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. ही घटना परभणीच्या गंगाखेड नाका परिसरातील घडली आहे.घटनेनंतर पत्नीला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या संतापजनक घटनेवरती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशा घटना रोखण्यासाठी मानसिकता बदलणं फार महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
मानसिकता बदलणं फार महत्त्वाचं- चाकणकर
एबीपी माझाशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, 'अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संताप निर्माण झाला आहे, गेली तीन वर्ष मी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून काम करत आहे. पण, महाराष्ट्रामध्ये फिरताना आजही अशा घटना घडताना दिसतात. चंद्रयान चंद्रावर गेलं त्याचा अभिमान आहे. मात्र, अद्यापही महिलांचे प्रश्न तसेच आहेत ते सोडवण्यासाठी मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. वरवरून दिसणारा दिखावा काहीही कामाचा नाही. मुलींच्या बाबतीत आजही आम्हाला वंशाचा दिवा हवा यासाठी अट्टहास केला जातो. केवळ ग्रामीण भाग नाही, शहरी भागांमध्ये देखील ही विकृती आहे, आम्ही राज्यात फिरतो तेव्हा त्या ठिकाणी महिलांचा गर्भपात होतो का, अशा घटना रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. पण, तरी देखील अशी विकृत मनोवृत्ती असल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पण, समाजामध्ये आजही सावित्रीबाईंनी जो लढा सुरू केला होता तो यशस्वी होताना दिसत नाही कारण अशा लोकांची विकृती संपविले नाही, असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात मी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करेल याबाबत जे दोषी असतील त्यांच्या कारवाई होईल यासाठी पाठपुरावा करेल याची सविस्तर माहिती मी लवकरच एबीपीला देईल अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी बोलताना दिली आहे.
दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान मृत महिला मैना काळे या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडताना आणि दुकानात शिरतानाचे धक्कादायक असे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीचा जीव घेणाऱ्या कुंडलिक काळे विषयी सध्या प्रचंड मनस्ताप व्यक्त केला जात आहे. यातील क्रूर पती कुंडलिक काळे यांच्याविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मैना काळे या महिलेला तिन्ही मुली झाल्यामुळे तिचा नवरा कुंडलिक उत्तम काळे हा शिवीगाळ करुन मारहाण करत होता. अनेकदा त्यांच्यामध्ये भांडण होत होते. 26 डिसेंबरला रात्री कुंडलिक काळे याने रागाच्या भरात मैना काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापासून तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुंडलिक काळे याच्यावर कोतवाली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. मैना कुंडलिक काळे असे मृतक महिलेचे नाव आहे. या बाबत मृतकाचे बहीण भाग्यश्री काळे हिने पोलिसात तक्रार दिली आहे.