Parbhani Crime : तिसरी ही मुलगीच झाल्याच्या रागातून संतापलेल्या पतीने माणुसकीला काळिमा फसणारे कृत्य केलं आहे. यात पतीने चक्क पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार परभणीती घडला आहे. या धक्कदायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी धावताना घरासह दोन दुकाने जळून खाक झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिसरी ही मुलगीच झाल्यामुळे पतीने आपल्या पत्नीचाचा डाव धरला. उठता बसता पत्नीला शिवीगाळ मारहाण करून तो तिच्याशी भांडायचा. गुरूवारी रात्री आठच्या दरम्यान पतीने कहरच केला. यात चक्क टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना कुंडलिक काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. ही घटना परभणीच्या गंगाखेड नाका परिसरातील घडली आहे.
काळीज पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
घटनेनंतर पत्नीला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृत महिला मैना काळे या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडतना आणि दुकानात शिरतानाचे धक्कादायक असे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाले आहे. एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीचा जीव घेणाऱ्या कुंडलिक काळे विषयी सध्या प्रचंड मनस्ताप व्यक्त केला जात आहे. यातील क्रूर पती कुंडलिक काळे यांच्याविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या संतापजनक घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
सावित्रीबाईंनी जो लढा दिला तो अद्याप यशस्वी होताना दिसत नाही- चाकणकर
दरम्यान, या संतापजनक घटनेवरती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, 'अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संताप निर्माण झाला आहे, गेली तीन वर्ष मी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून काम करत आहे. पण, महाराष्ट्रामध्ये फिरताना आजही अशा घटना घडताना दिसतात. चंद्रयान चंद्रावर गेलं त्याचा अभिमान आहे. मात्र, अद्यापही महिलांचे प्रश्न तसेच आहेत ते सोडवण्यासाठी मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. वरवरून दिसणारा दिखावा काहीही कामाचा नाही. मुलींच्या बाबतीत आजही आम्हाला वंशाचा दिवा हवा यासाठी अट्टहास केला जातो. केवळ ग्रामीण भाग नाही, शहरी भागांमध्ये देखील ही विकृती आहे, आम्ही राज्यात फिरतो तेव्हा त्या ठिकाणी महिलांचा गर्भपात होतो का, अशा घटना रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. पण, तरी देखील अशी विकृत मनोवृत्ती असल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पण, समाजामध्ये आजही सावित्रीबाईंनी जो लढा सुरू केला होता तो यशस्वी होताना दिसत नाही कारण अशा लोकांची विकृती संपविले नाही, असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा