परभणी : मराठा आरक्षण आंदोलनाचा (Maratha Reservation) पुन्हा एकदा फटका रासप आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांना बसला. चार दिवसांपूर्वी आंदोलकांनी आमदार गुट्टे यांचा एक उद्धाटन कार्यक्रम रोखल्यानंतर आज त्यांना गंगाखेड तालुक्यातील पडेगाव (Padegaon Parbhani) येथे त्यांना गावात येऊ दिले नाही. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत गावातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना गावाच्या बाहेरच अडवण्यात आले आणि तिथूनच त्यांना परत पाठवण्यात आले.  


परभणीच्या गंगाखेड येथील पडेगावमध्ये संत मोतीराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले होते. या निमित्ताने कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रत्नाकर गुट्टे हे पडेगावमध्ये दाखल होत असताना पडेगाव मधील मराठा बांधवांनी त्यांना गावाच्या बाहेरच अडवले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात बंदी आहे, तुम्ही गावात येऊ नका असे म्हणत त्यांना तिथूनच परत पाठवले. 


लोकप्रतिनिधी म्हणून दिवाळीच्या अनुषंगाने लोकांच्या भेटी घ्यावी लागतात,  मराठा समाजाने काही कार्यक्रमातून नेत्यांना गावात येणे वगळावे, काही कार्यक्रमाला येऊ द्यावं अशी विनंती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली. मात्र तरीही गावकऱ्यांनी त्यांची विनंती ऐकली नाही. त्यामुळे गुट्टे यांना त्या ठिकाणाहून परत जावं लागलं. 


मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज 


मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तत्पूर्वी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.  यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मी कुटुंबीयांसोबत बोललो नाही, कदाचित माझं कुटुंब ही दिवाळी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. मात्र दोन दिवसांच्या आरामानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरु करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटलं आहे. 


मनोज जरांगे 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार आहे. यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई असा दौरा असेल. 24 डिसेंबरपर्यत सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळणार असल्याचे सांगत हा महाराष्ट्र दौरा सरकारवर दबावासाठी काढला जाणार नाही तर लोकांच्या भेटीगाठीसाठी काढण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


ही बातमी वाचा: