परभणी : केंद्र सरकारच्या (Central Government) विकसित भारत संकल्प यात्रेवरून (Viksit Bharat Sankalp Yatra) अनेक ठिकाणी वाद उद्भवत असून, गावकऱ्यांचा विरोधही होत आहे. दरम्यान, याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता अधिकारी आणि कर्मचारी यात्रा राबवण्यास नकार देत आहेत. परभणीच्या (Parbhani) आठ विस्तार अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून थेट भारत संकल्प यात्रेच्या कामकाजाला नकार दिला आहे. यात्रेवरून गावात होणारे वाद आणि त्यातून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे जीवाला धोका असल्याचा दावा या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्प यात्रेच्या कामकाजाला नकार देणारे लेखी पत्रच थेट जिल्हाधिकारी यांना पाठवून अधिकाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला आहे. 


केंद्र सरकारच्या योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा ही गावोगावी जात आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर समन्वय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. या यात्रेला अनेक गावांमध्ये प्रतिसाद देखील मिळतोय. मात्र, याचवेळी काही ठिकाणी जोरदार विरोध देखील केला जातोय. काही ठिकाणी मारहाण केल्याच्या घटना देखील समोर आली आहेत. यात्रेच्या रथावर 'मोदी सरकारची हमी' असे उल्लेख असून, त्यावर मोदींचे मोठमोठे फोटो असल्याने 'तुम्ही मोदींचा प्रचार' करत आहेत का? असा सवाल गावकरी अधिकाऱ्यांना विचारत आहे. सोबतच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावबंदी असतांना शासकीय योजना गावात येण्यास विरोध होत आहे. 


जिल्हाधिकारी यांना लिहण्यात आलेल्या पत्रात काय म्हटले आहे? 


या सर्व पार्श्वभूमीवर आता परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून विकसित भारत संकल्प यात्रेचे काम करण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकारी यांना लिहण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, “गावात गेल्यानंतर गावकरी या यात्रेत तुम्ही मोदींचा प्रचार का करत आहात, भारत सरकारचा करा असा जाब विचारत आहेत. त्यातच या योजनेच्या चित्र रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्याने आम्ही या लोकांना तोंड देऊ शकत नाहीत. त्यामुळे पोलीस संरक्षण द्या, अन्यथा आम्ही या यात्रेचे कामकाज करणार नाहीत अशा आशयाचे पत्र थेट जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना पाठवले आहे. या पत्रावर परभणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.व्ही पानपाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सांख्यिकी एम. एस सय्यद, आरोग्य विस्तार अधिकारी डी.आर.कराळे, आरोग्य विस्तार अधिकारी यु.टी.राठोड, कृषी विस्तार अधिकारी एस.एस.डोंगरदिवे, कृषी विस्तार अधिकारी एस.आर. कुडमुलवार, कृषी विस्तार अधिकारी एस. पी. जोशी, विस्तार अधिकारी पंचायत एस.आर. चिलगर या आठ समन्वय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन या यात्रेचे काम आपण करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्प यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange Patil : तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा