बीड: धनंजय मुंडे यांचा नोकर असलेल्या गोविंद बालाजी मुंडे याने मला जमिनीच्या व्यवहारात फसवले. माझ्या जमिनीचा भाव साडेतीन कोटी रुपये होता. पण मला फक्त 21 लाख रुपये देण्यात आले, असा आरोप सांरगी महाजन यांनी केला या व्यवहारात माझ्याकडून कागदांवर जबरदस्तीने सह्या घेण्यात आल्या. नंतर ही जमीन माझी असल्याचे न दाखवता, गोविंद मुंडे, पल्लवी गीते आणि दशरथ चाटे यांना जमिनीचे मालक दाखवण्यात आले. पल्लवी गीते ही गोविंद मुंडेची सून आहे. गोविंद मुंडे हा पंडित अण्णांची सेवा करायचा. त्याच्या बायकोला धनंजय मुंडेंनी नगरसेवकपद दिलं होतं. नगरसेवक झाल्यावर गोविंद मुंडे याने चार गाड्या, एक बंगला, फार्म हाऊस, स्टोन क्रशरचा बिझनेस, शेती एवढी माया जमवली, असे सारंगी महाजन यांनी म्हटले. त्या बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. माझी फसवणूक झाल्यानंतर मी दीड वर्षे धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे लागले होते. 'राजा', 'बाबू' , 'बेटा' असे सगळे बोलून त्याच्याकडे मदत मागितली. तू माझा नातेवाईक आहेस, तू मामीला मदत करु शकतोस, असे मी त्याला सांगितले. मी धनंजयला भेटायला परळीला जायचे तेव्हा तो निघून जायचा. मग मी त्याच्या आईला भेटायचे. जेव्हा धनंजय मुंडे आजारी होते तेव्हा मी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भेटायला गेले होते. मी तिकडेही जमिनीचा विषय काढला. तेव्हा धनंजय म्हणाला, मामी तू घाबरु नकोस, मी तुझी जमीन मिळवून देतो. मी परळीचा किंग आहे. परळीत कुठलीही जमीन विकली की मला कळते. माझ्याशिवाय परळीत कुठलीही जमीन विकली जात नाही. तेव्हा मला या सगळ्या प्रकरणात धनंजयचा हात असावा, असा अंदाज आल्याचे सारंगी महाजन यांनी म्हटले. माझी वाल्मिक कराडसोबत भेट झाली नाही. पण माझी फसवणूक करण्यात त्याचा हात असू शकतो गोविंद मुंडे मला धाक दाखवायचा, तुम्ही परळीत आला तर लगेच वरपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना कळते, असेही सारंगी महाजन यांनी म्हटले.
पंकजा मुंडे यांच्यावर सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
गोविंद मुंडे याने मला धाक दाखवून लाटलेल्या माझ्या जमिनीवर आता पंकजा मुंडे यांनी झोपडी बांधली आहे. त्याठिकाणी पंकजाने एक जोडपं ठेवलं आहे, त्या जमिनीवर गुरं चरतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला हे प्रकरण मार्गी लावून देतो, असे आश्वासन दिले आहे. धनंजय मुंडे यांनी परळीतील अर्ध्यापेक्षा अधिक जमिनी लुटल्या आहेत. धनंजय मुंडे दुसऱ्यांच्या नावाने जमीन घेतो आणि तीन वर्षांनी ती आपल्या कब्जात घेतो. धनंजयबद्दल असं बोलताना मला वाईट वाटतं, पण तो वागतोच तसा, असे सारंगी महाजन यांनी म्हटले.
आणखी वाचा