वसई : राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना (Vasai Drunk And Drive Case) वाढत असून यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. यात माणसांचे जीव जात आहेतच, त्यामधून आता मुके प्राणीही सुटत नसल्याचं दिसतंय. वसईत एका धनाढ्य बापाच्या मुलाने भरधाव गाडी एका घरात घुसवली आणि एका निष्पाप मुक्या जनावराचा जीव घेतल्याची घटना घडली. नेहमीप्रमाणे या प्रकरणातही मुलगा धनाड्य बापाचा असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय. तो मुलगा गाडी चालवत नसून ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं सांगण्यात आलं आणि त्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसईत दारूच्या नशेत इनोव्हा कार चालकाने एका कुत्र्याचा बळी घेतला आहे. भराधाव वेगात कारचालकांचे नियंत्रण सुटल्याने ती कार डिव्हायडर आणि फुटपाथ ओलांडून चक्क एका घरात घुसल्याची घटना उघड झाली आहे. वसई तहसील समोरील सिद्धार्थनगर येथे MH 14 DR 7145 या इनोव्हा कार चालकाने मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात केला आहे.
कारचालकाचं नियंत्रण सुटलं
ज्याची कार आहे त्याचं नाव प्रतीक दवे आहे. तर ज्याने दुर्घटना केली त्या कार चालकाचं नाव कैवल्य जयकर असं आहे. कैवल्य जयकर, अनिस जयकर आणि प्रतीक दवे हे तिघे इनोव्हा कारने वसई तहसील समोरून वसई स्टेशनच्या दिशेने जात होते. सिद्धार्थनगर परिसरात कार चालकांचे नियंत्रण सुटल्याने त्याने ती कार डिवायर क्रॉस करुन गणेश जाधव यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीला आदळली.
या दुर्घटनेत एक मोटार सायकल, कॅन्टिनचे टेबल, खुर्च्यांचं नुकसान झालं. झोपलेल्या अवस्थेत असलेल्या एका कुत्र्यालाही कारने चिरडलं आहे. यात त्या कुत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत वसई पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी चालकाची मेडिकल तपासणी केली असता त्याने दारू पिल्याचे निष्पन्न झाले आहे. यात चालकाला अद्याप अटक करण्यात आली नाही. एकीकडे राज्यात हिट अँड रनच्या घटनांमुळे मनुष्यांचा जीव जात आहे, आता वसईतही अशीच घटना घडून निष्पाप जनावराचाही जीव गेला. त्यामुळे कुणीही सुरक्षित नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ही बातमी वाचा: