Ramesh Bais : आंतरराष्ट्रीय पातळीवर बांबू (Bamboo) पासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना मोठी मागणी आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करून त्याची विक्री केल्यास आदिवासी समाज (tribal society) आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन स्वावलंबी बनेल असा विश्वास राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी व्यक्त केला. पालघर (Palghar) जिल्ह्यातील वसई तालुक्यातील भालीवली इथं बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्ग समारोप कार्यक्रमात राज्यपाल बोलत हते. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना बांबू हस्तकला प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  


मी सुद्धा लाकडापासून विविध वस्तू निर्माण केल्या आहेत


आपण सर्वांनी बांबू हस्तकलेचे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे राज्यपाल बैस म्हणाले. आपण बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण इतरांनाही देऊन त्यांनाही स्वावलंबी केले पाहिजे असे ते म्हणाले. मी सुद्धा लाकडापासून विविध वस्तू निर्माण केल्या आहेत. काही काळापूर्वी श्रीगणेशाची सुंदर लाकडी मूर्ती तयार केली असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.


आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सेवा विवेक संस्थेकडून विविध उपक्रम


अनुसूचित जाती जमातीच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रेरणा देणे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे हे आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 46 मध्ये नमूद करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवत असल्याचे राज्यपाल म्हणाले. सेवा विवेक या संस्थेनं सुद्धा आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सेवा विवेक या संस्थेने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आतापर्यंत जे कार्य केले आहे, त्यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या  विविध वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी सेवा विवेक संस्था प्रयत्न करत आहे.


जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार


बांबूच्या शेतीसाठी शेतकरी वर्गांना प्रेरित केले तर बांबूच्या वस्तूच्या उत्पादनाला नियमित बाजारपेठ उपलब्ध होईल असेही राज्यपाल यावेळी म्हणाले. प्राचीन काळापासून  लाकडापासून वस्तू तयार करण्याची परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. ही परंपरा, कला आदिवासी समाजाने जतन करून ठेवल्याचे राज्यपाल म्हणाले. देशाच्या पारंपारिक कलेला चालना देण्यासाठी जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : आयटी क्षेत्र सोडलं, बांबू शेतीची नातं जोडलं, वाचा नाशिकच्या तरुणाची यशोगाथा!