पालघर : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन आर्थिक झळही बसली आहे. विशेष म्हणजे शेतकरी त्रस्त झाला असून अद्यापही शेवटच्या टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया बाकी असल्याने प्रशासन निवडणूक कामातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पालघरच्या (Palghar) जव्हार मोखाडा या परिसराला मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलंच झोडपून काढला असून येथील शेकडो घरांचा नुकसान झालं आहे. अनेक घरांची छप्पर या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने उडाली असून येथील शेकडो कुटुंब सध्या उघड्यावर आले आहेत. येथील ग्रामस्थांच्या घरासह घरातील साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याने या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झालाय. 


जव्हार मोखाडा या दोन्ही तालुक्यांमधील शेकडो गावपाड्यांमधील घरांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून अनेक घरांची छप्पर आणि भींती जमीनदोस्त झाले आहेत. तसेच, आश्रम शाळेच्या इमारतीचंही मोठ नुकसान झाल्याचं दिसून आलं. वीज महावितरण विभागाचे पोल देखील कोलमडून पडल्याने मागील दोन दिवसांपासून या भागातील विजापूरवठा खंडित झाला आहे. अजूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असून प्रशासन सध्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत व्यस्त असल्याने पंचनामे देखील होत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. येथील परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांची व्यथा एबीपी माझाने जाणून घेतली आहे. 


जिल्ह्यातील प्रशासन आणि राजकीय नेते सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी मात्र घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली. प्रशासन व्यस्त असले तरी देखील आमचे कार्यकर्ते येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करत असल्याचं भुसार यांनी सांगितलं. मागील काळात झालेल्या नुकसानीची मदत अजूनही सरकारने दिली नसल्याचा आरोप देखील आमदार भुसारा यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, पालघर लोकसभेचे पाचव्या टप्प्यात मतदान असून यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र, मतदान प्रक्रियेत संपूर्ण जिल्हा प्रशासन व्यस्त असल्याने मतदान झाल्यानंतरच या नुकसानग्रस्तांची पाहणी आणि पंचनामे होणार का असा संवाल उपस्थित केला जात आहे. 


हेही वाचा