पालघर: डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल श्रावणातील पहिला सोमवार होता. रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यानंतर आश्रमशाळेतील (Rankol Ashram School) सर्वजण झोपी गेले. मात्र, मंगळवारी पहाटे आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना मळमळ होऊ लागली. त्यानंतर 27 विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. या सगळ्यांना तातडीने नजीकच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा (Food Poisining) झाल्याचे निष्पन्न झाले. या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


काही विद्यार्थिनींना रात्रीपासूनच त्रास जाणवत होता. त्यांना रुग्णालयात दाखल करुन तातडीने  उपचार सुरु करण्यात आले होते.  त्यापैकी आठ विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत, तर 20 विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर 10 विद्यार्थिनींना ऐना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रदीप भोये यांनी दिली. 


आश्रशाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा कशामुळे झाली?


डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कांबळगाव येथील सेंट्रल किचन मधून हा भोजन पुरवठा करण्यात येतो. हे सेंट्रल किचन शासन स्वतः चालवते. सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळ्याची भाजी होती. या भाजीमधून ही विषबाधा झाली असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. रणकोळ, आंबेसरी, खंबाळे या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना बाधा झाल्याची माहिती मिळत असून रणकोळ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ऐना  आणि कासा येथील शासकीय रुग्णालयात  तर खंबाळे येथील विद्यार्थ्यांना वाणगाव आणि आंबेसरील येथील विद्यार्थ्यांना गंजाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत असून ह्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे.


आणखी वाचा


गडचिरोलीत बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा, तर अमरावतीत अन्नातून विषबाधा झाल्याने दोन मुलींचा दुर्दैवी अंत 


आठवडी बाजारात खाल्लेली पाणीपुरी बाधली; उलट्या, जुलाब, पोटदुखीनं अनेकजण त्रस्त, 80 हून अधिक जणांना विषबाधा